मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल सहापदरी होणार !

मिरज – मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल सहापदरी होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जुना पूल न पाडता दोन्ही बाजूला नव्याने पूल उभारण्यात येणार आहेत आणि नंतर जुना पाडून परत दोन्ही पूल जोडण्यात येतील, असा निर्णय पुणे येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील उड्डाणपूल सध्या जीर्ण झाल्याने त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. यात हा पूल धोकादायक असून यावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. हा पूल पाडून नव्याने उभारणी करण्यासाठी ५ मासांचा कालावधी लागणार होता. असे झाल्यास सांगली-मिरज या मार्गावरील मुख्य वाहतूक थांबणार होती आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार होती. त्यामुळे नवीन पूल बांधून मग जुना पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.