स्वतःच्या मंत्र्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे संतापलेल्या मालदीवमधील महिला खासदाराने भारतियांची क्षमा मागितली !

मालदीवच्या खासदार इवा अब्दुल्ला

माले (मालदीव) – मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांविषयी तेथील खासदार इवा अब्दुल्ला यांनी भारताची क्षमा मागितली आहे. खासदार अब्दुल्ला यांनी मंत्र्यांनी केलेली विधाने लाजिरवाणी आणि वर्णद्वेषी असल्याचे सांगत त्यांच्या मंत्र्यांना खडसावले आहे. यासह मालदीववरील बहिष्काराचा ‘ट्रेंड’ थांबवण्याची विनंतीही अब्दुल्ला यांनी भारतीय नागरिकांकडे केली आहे.

इवा अब्दुल्ला म्हणाल्या, आमच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांवर भारतियांनी व्यक्त केलेला संताप मी समजू शकते. मंत्र्यांनी केलेली विधाने संतापजनकच आहेत. त्यांच्या वक्तव्याप्रकरणी मी भारतीय नागरिकांची क्षमा मागते.

माजी राष्ट्रपती महंमद नशीद यांच्याकडूनही तीव्र खंत व्यक्त !

मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नशीद यांनीही त्यांच्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांविषयी तीव्र खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी या प्रकरणी भारताशी चर्चा करून बाजू मांडली पाहिजे. मालदीवमध्ये आदरातिथ्य, शांतता आणि सहिष्णुता या सूत्रांवर पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. भारतासह जगभरातील अनेक आस्थापनांनी मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे.