नम्र, सतत शिकण्याच्या स्थितीत असलेले आणि साधकांविषयी अपार प्रीती असलेले सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीत सर्वांत महत्त्वाचे योगदान  पू. संदीपदादा यांचे आहे. ते समर्थपणे ती सेवा सांभाळत आहेत. ती सेवा करतांना ते अन्य साधकांनाही ती सेवा करण्यासाठी सिद्ध करत आहेत. ग्रंथनिर्मितीची ही सेवा पुढे चालू रहाण्यासाठी पू. संदीपदादा अनेक लहान वयाच्या साधकांना घडवून सिद्ध करत आहेत. ते या साधकांवर अपार प्रीती करतात आणि त्यांच्यामध्ये सेवेची तळमळही निर्माण करतात. साधिकेने अनुभवलेली त्यांची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन येथे दिले आहे.

(भाग १)

पू. संदीप आळशी

१. नम्रता आणि शिकण्याची वृत्ती

‘पू. संदीपदादा आमचा (ग्रंथनिर्मिती सेवेतील साधकांचा) प्रत्येक आठवड्याला सत्संग घेतात. एकदा या सत्संगाला प्रसारात सेवा करणार्‍या काही साधिका शिकण्यासाठी बसल्या होत्या. पू. संदीपदादांनी पुष्कळ उत्सुकतेने प्रसारातल्या साधिकांचे साधनेचे प्रयत्न विचारून घेतले.

पू. संदीपदादा त्या सांगत असलेले प्रयत्न लिहूनही घेत होते. सत्संगाच्या शेवटी पू. संदीपदादा त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला आमच्याकडून शिकायला पाठवले आहे कि तुमच्याकडून आम्हाला शिकण्यासाठी पाठवले आहे ? ‘आम्हाला तुमच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले’, असे म्हणून त्यांनी त्या साधिकांना भावपूर्ण नमस्कार केला.

२. प्रीती

२ अ. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतांना साधिकेला भावपूर्ण नमस्कार करून हात जोडून प्रार्थना करणे : गुढीपाडव्याच्या दिवशी मी त्यांच्याकडे गेले असतांना त्यांनी मला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन नमस्कार केला आणि जवळपास ५ मिनिटे ते हात जोडून अन् डोळे मिटून उभे होते. ते अत्यंत भावपूर्ण काहीतरी प्रार्थना करत होते.

२ आ. एका संतांनी प्रसादरूपात पाठवलेल्या २ गुलाबजामपैकी एक गुलाबजाम साधिकेला देणे : एकदा एका सेवेसाठी मी त्यांच्या खोलीत गेले होते. एका संतांनी त्यांना २ गुलाबजाम दिले होते. त्यांनी मला त्यातील एक गुलाबजाम वाटीत घालून खायला दिला आणि म्हणाले, ‘‘तुला आवडतात ना ? एरव्ही मी दोन्ही तुलाच दिले असते; पण आज मला त्रास होत असल्याने मला प्रसादाची आवश्यकता आहे; म्हणून मी एक गुलाबजाम खातो.’’

कु. मधुरा गोखले

२ इ. स्वतःच्या अल्पाहारामधील ढोकळा साधिकेला प्रेमाने देणे : एकदा माझ्याकडे त्यांना अल्पाहार द्यायची सेवा होती. मी त्यांना अल्पाहार नेऊन दिल्यावर आमच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला.

पू. संदीपदादा : तुला ढोकळा आवडतो का ? आज न्याहारीला माझ्यासाठी ढोकळा बनवला आहे. तूही घे.

मी त्यातील एकच तुकडा घेतल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आणखी घे. ‘एकाने काय होणार ?’, असे म्हणून त्यांनी मला एक वाटी दिली आणि त्यात ५ – ६ ढोकळ्याचे तुकडे घ्यायला लावले.

मी (मधुरा गोखले) : तुम्ही मला एवढे दिले, तर तुम्हाला काहीच रहाणार नाही.

पू. संदीपदादा : मी एकटा किती खाणार ? तूही घे आणि सेवेतल्या साधकांना आवडत असेल, तर त्यांनाही दे. एक तुकडा खायला मजा येत नाही ना ? आणखी लागला, तर घेऊन जा.

३. सेवेची तीव्र तळमळ

३ अ. ‘महाप्रसाद घेण्याचा वेळही सेवेलाच द्यावा’, असे वाटणारे पू. संदीपदादा ! : पू. संदीपदादांची प्रकृती नाजूक आहे, तरीही त्यांना गुरुसेवा अखंड करत रहाण्याची तळमळ असते. एकदा ते मला म्हणाले, ‘‘ग्रंथनिर्मितीसाठी गुरुदेवांनी संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पानेच हे कार्य पूर्णत्वाला जाणार आहे. तरीही मला ‘महाप्रसाद घ्यायलाही खाली जावे’, असे वाटत नाही. तो वेळ सेवेलाच द्यावा’, असे मला वाटते.’’

३ आ. ग्रंथनिर्मिती सेवेसाठी नवीन साधक सिद्ध करण्याची तळमळ ! : पू. संदीपदादा मला नेहमी सांगतात, ‘‘तू पुढच्या पुढच्या टप्प्याच्या सेवा लवकर शिकून घे. आता आमची पिढी जुनी झाली. तुम्हालाच हिंदु राष्ट्र्राचे मोठे कार्य करायचे आहे.’’

३ इ. सेवांमुळे पुष्कळ व्यस्तता असूनही ग्रंथनिर्मिती सेवेतील साधकांच्या साधनेचा आढावा घेणे : त्यांच्याकडे पुष्कळ सेवा असल्यामुळे ते सतत व्यस्त असतात. तरीही ‘ग्रंथनिर्मिती सेवेतील सर्व साधकांची व्यष्टी साधना चांगली व्हावी आणि त्यांच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढावी’, यांसाठी ते प्रत्येक आठवड्याला आमचा १ ते १.३० घंटा साधनेचा आढावा सत्संग घेतात.

४. अल्प अहं

४ अ. ‘माझ्या अक्षरांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे चैतन्य आणि शक्ती नाही’, असे नम्रतेने सांगणे : पू. संदीपदादांचे अक्षर अगदी गुरुदेवांसारखे आहे. मी त्यांना म्हणाले, ‘‘तुमचे अक्षर अगदी तंतोतंत गुरुदेवांसारखेच आहे.’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘माझे केवळ अक्षरच गुरुदेवांसारखे आहे; पण माझ्या अक्षरांत त्यांच्याप्रमाणे चैतन्य आणि शक्ती  नाही.’’ यातून मला ‘त्यांचा अहं किती अल्प आहे’, हे लक्षात आले.

४ आ. ‘आता कुठे मला थोडी सेवा करायला जमत आहे’, असे सांगणारे पू. संदीपदादा ! : एकदा ते मला माझ्या सेवेविषयी विचारत होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘माझ्याकडून सेवेत चुका होतात.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी एवढी २० वर्षे सेवा करत आहे. गुरुदेवांनी मला शिकवले; म्हणून आता कुठे मला ग्रंथसेवा करता यायला लागली आहे. तूही शिकशील. काळजी करू नकोस.’’

५. सूक्ष्मातील कळण्याची अफाट क्षमता !

५ अ. ‘पू. संदीपदादांनी साधनेविषयी सूत्रे सांगावी’, असे मनात येताच त्यांनी साधनेविषयीची सूत्रे सांगणे : एकदा एक वस्तू पू. संदीपदादांना देण्यासाठी मी त्यांच्या खोलीकडे जात होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘पू. संदीपदादांनी मला साधनेविषयी काही सूत्रे सांगायला हवी.’ मी त्यांच्या खोलीजवळ जाताच त्यांनी दार उघडून मला आत बोलावले आणि मला साधनेविषयी काही मोलाची सूत्रे सांगितली.

५ आ. साधिकेने मनातील विचार न सांगताही त्यावर सत्संगात दृष्टीकोन देणे : माझ्या मनात एका प्रसंगाविषयी पुष्कळ विचार येत होते. मी ते कुणाला सांगितले नव्हते; पण त्याच दिवशी झालेल्या सत्संगात पू. संदीपदादांनी माझ्या मनात येणार्‍या विचारांवर दृष्टीकोन दिले. प्रत्यक्षात मी त्यांना त्याविषयी काहीच सांगितले नव्हते अाणि तसा काही विषयही सत्संगात चालू नव्हता; परंतु तरीही त्यांनी त्यावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना ते माझ्याकडेच पाहून बोलत होते. असे २ वेळा घडले.

५ इ. पू. संदीपदादा बोलल्याप्रमाणे पुढे २ – ३ दिवसांत घडणे : अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून आम्हाला त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता नेहमी जाणवते. कधी कधी ते काही बोलून जातात आणि तसेच पुढे २ – ३ दिवसांत घडते किंवा नंतर येणार्‍या काही प्रश्नांची उत्तरेही त्यांनी आधीच दिलेली असतात.’

(क्रमशः)

– कु. मधुरा गोखले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (११.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक