पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) : गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा समुद्रकिनारपट्टी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरण आणि मामलेदार यांनी स्थानिक पंचायतीच्या सहकार्याने संयुक्तपणे गिरकारवाडो, हरमल येथील नियमबाह्य चालू असलेल्या ५१ आस्थापनांना बंद करण्याच्या नोटिसा वितरित केल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा वितरित करतांना मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज नेमण्यात आली होती.
(सौजन्य : Prudent Media Goa)
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नियमबाह्यरित्या चालू असलेली उपाहारगृहे, विश्रांती गृहे (रेस्ट हाऊस) आदींना टाळे ठोकण्याचा आदेश दिला आहे. सामेवार, ८ जानेवारीपासून टाळे ठोकण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात १७ जानेवारी या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे. संबंधित आस्थापनांच्या मालकांनी यापूर्वी या विषयावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्यांना आवश्यक ठिकाणी कायदेशीर साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
संपादकीय भूमिकानियमबाह्य ५१ आस्थापने निर्माण होईपर्यंत प्रशासन काय करत होते ? |