Pakistan Accuses India : (म्हणे) ‘भारत बलुची आतंकवाद्यांना पैसा पुरवतो !’ – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर

  • पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांचा भारतावर फुकाचा आरोप !

  • बलुचिस्तानला बांगलादेश बनू देणार नसल्याचाही काकर यांनी केला दावा !

पाकिस्तानचचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर

लाहोर (पाकिस्तान) – बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या आतंकवाद्यांना भारत आणि त्याची गुप्तचर संस्था ‘रॉ’कडून निधी मिळतो, असा आरोप पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी केला आहे. ते लाहोरमधील बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘बलुचिस्तानमधील ९८ टक्के लोक अजूनही पाकिस्तानसमवेत आहेत. हे वर्ष १९७१ नाही. बलुचिस्तान हा बांगलादेश नाही, जो वेगळा होईल’, असे विधानही त्यांनी भारताला उद्देशून केले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात बलुची लोकांकडून आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काकर यांनी हे विधान केले.

१. पंतप्रधान काकर पुढे म्हणाले की, आमचा लढा बलुचिस्तानातील सशस्त्र संघटनांविरुद्ध आहे. बलुची लोकांविरुद्ध नाही. बलुची आंदोलकांना समजले पाहिजे की, त्यांचे कुटुंबीय देशाविरुद्ध काम करत होते. हे परकीय साहाय्याने केलेले सशस्त्र बंड आहे. भारतात कुणी आय.एस्.आय.च्या पैशाने लढू देत, मग पहा त्याची काय अवस्था होईल.

२. बलुचिस्तानमध्ये २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पाकच्या आतंकवादविरोधी विभागाने केलेल्या कारवाईत ४ संशयित आतंकवाद्यांना ठार केले होते. त्यात बलुच असलेला मौला बक्श नावाच्या तरुणाचाही समावेश आहे. यावरून पाकमध्ये मोठे आंदोलन चालू झाले आहे. लोकांनी बलुचिस्तान ते इस्लामाबाद असा १ सहस्र ६०० कि.मी. लांब मोर्चा काढला. आतंकवादविरोधी विभागाकडून शस्त्रे जप्त करण्यात यावी आणि त्यांच्या कह्यात असलेल्या बलुची लोकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी लोकांनी केली. काकर हेदेखील बलुचिस्तानचे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर याप्रकरणी टीका होत आहे.


काय आहे बलुचिस्तानचे प्रकरण ?

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक प्रांत आहे. त्याची राजधानी क्वेटा आहे. त्याची सीमा इराण आणि अफगाणिस्तान यांना लागून आहे. सोने, तांबे, तसेच अन्य खनिजांच्या खाणी या प्रांतात आहेत. त्याचा पाकला प्रचंड लाभ होतो. बलुचिस्तानच्या लोकांचे म्हणणे आहे की, या प्रदेशातून इतका लाभ  घेऊनही पाकिस्तान सरकार येथील लोकांसाठी काहीही करत नाही. बलुचिस्तानची जनता वर्ष १९४८ पासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात आहे. ते पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. ते ‘बलुच नॅशनल मुव्हमेंट’ नावाची चळवळ चालवत आहेत. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे. १९७० च्या दशकात ‘बलुच लिबरेशन आर्मी’ची स्थापना झाली. तसेच ‘माजिद ब्रिगेड’ २०११ मध्ये अस्तित्वात आली. कराची स्टॉक एक्सचेंज आणि ग्वादर येथील आक्रमणात माजिद ब्रिगेडचे नाव समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हा बलुचिस्तान पाकचा भाग नव्हता. पाकने त्याच्यावर आक्रमण करून तो कह्यात घेतला. ‘तेथील लोक स्वातंत्र्यासाठी गेली ७५ वर्षे आंदोलन करत आहेत’, हे जगाला ठाऊक आहे. असे असतांना आंदोलकांना ‘आतंकवादी’ म्हणणे आणि त्यांना साहाय्य केल्याचा भारतावर आरोप करणे, हा पाकचा भारतद्वेष आहे !
  • बलुचिस्तानचे बांगलादेश नव्हे, तर पुढील २-३ वर्षांत पाकचे ४ तुकडे होणार आहेत, हे त्याच्या नेत्यांनाही ठाऊक आहे; मात्र स्वतःच्या जनतेला अंधारात ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत !