Farah Ansari Becomes JANAKI : बरेली (उत्तरप्रदेश) येथील फराह अन्सारी ही राम नावाच्या युवकाशी विवाह करून  बनली ‘जानकी’ !

बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये फराह अन्सारी नावाच्या मुसलमान मुलीने हिंदु धर्म स्वीकारला आणि तिने राम नावाच्या हिंदु मुलाशी लग्न करून त्याची ‘जानकी’ बनली. ३० डिसेंबर २०२३ या दिवशी भुटा पोलीस ठाण्याच्या सीमेतील अयोध्या धाम मंदिरात दोघांचा विवाह पार पडला.

या विवाहाला दोघांचेही कुटुंबीय आले नव्हते. या प्रेमी युगुलाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट करून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. याविषयी माहिती देतांना २३ वर्षीय जानकीने म्हणाली, ‘‘मी राम याला अनेक वर्षापासून ओळखते. आम्ही दोघेही लहानपणी एका खासगी शाळेत एकत्र शिकत होतो. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. मला राम याच्याशी विवाह करायचा होता; म्हणून मी हिंदु धर्म स्वीकारला. विवाहानंतर माझे नाव जानकी ठेवण्यात आले. हे सर्व मी माझ्या इच्छेने केले आहे.’’

बी.टेक. पूर्ण केल्यानंतर राम भुटा शहरात शिकवणी वर्ग घेत होता. हिंदु मुलाबरोबरच्या प्रेम प्रकरणाला फराहच्या घरच्यांचा विरोध होता. विवाहाच्या ३ दिवस आधी फराहच्या कुटुंबियांनी तिला खोलीत कोंडून ठेवून मारहाण केली होती. याविषयी माहिती मिळताच राम तिच्या घरी गेला आणि तिला घेऊन थेट भुटा पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर दोघांनी वरील ठिकाणी विवाह केला. या वेळी नवविवाहित जोडप्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भुटा येथील प्रचारक सर्वेंद्र, खंड कार्यवाह परमात्मा स्वरूप यांच्यासह अनेकांनी आशीर्वाद दिले.