मतदारसूची शुद्धीकरणाची कार्यवाही चालू !
पुणे – निवडणूक आयोगाने मतदारसूची शुद्धीकरणासाठी कार्यवाही चालू केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात एकाच मतदाराचे २ ठिकाणी नाव नोंदणीचे २८ सहस्र, तर समान छायाचित्र असणारे १ लाख ४२ सहस्र ३४९ मतदार आढळले आहेत. (या गोंधळास उत्तरदायी असणार्यांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक) संबंधित मतदारांनी मतदानसूचीमध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी मतदारांना ‘नमुना अ’ मध्ये नोटीस पाठवली आहे.
भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०’च्या कलम १७ आणि १८ अन्वये एका मतदाराची मतदारसूचीमध्ये एकच नोंद असणे आवश्यक आहे. मतदारांना नोटीसमधील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. मतदाराचे नाव कोणत्या एका ठिकाणी असणे अपेक्षित आहे, हे ठरवण्याचा अधिकार मतदाराला दिला असून मतदाराने ई-मेल पत्त्यावर आधारकार्डाच्या छायांकीत प्रतीसह अपलोड करावे किंवा संबंधित मतदाराने केंद्र स्तरीय अधिकार्यांची भेट घेऊन त्यांच्या साहाय्याने पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
संपादकीय भूमिकाप्रशासनाचा भोंगळ कारभार |