एका संगीत मंचावरील कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला
पणजी : आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्यावर पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सनबर्नवर पहिल्याच रात्री (२८ डिसेंबरच्या रात्री) कारवाई करतांना त्यांचा एका मंचावर चालू असलेला संगीताचा कार्यक्रम बंद पाडला. संगीतासह तेथील दिवेही बंद करायला लावले. एवढेच नाही, तर पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन होणार नाही, हे पहातांना कार्यक्रम १० वाजता बंद होईल, असे पाहिले.
वागातोर येथे होणार्या ३ दिवसांच्या या कार्यक्रमाचा २८ डिसेंबर हा पहिलाच दिवस होता. गोवा सरकारने ‘सनबर्न कार्यक्रम १० वाजल्यानंतर चालू रहाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, तसेच संगीताचा आवाजही मर्यादेतच राहील अन्यथा कार्यक्रम बंद करण्यात येईल’, असे न्यायालयात सांगितले होते. त्याप्रमाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (न्यायालयाने नोंद घेतल्यामुळे यावर्षी कारवाई झाली. त्यापूर्वी प्रशासन आणि पोलीस स्वतःचे कर्तव्य विसरले होते कि त्यांचे आर्थिक हितसंबंध होते ? – संपादक)
गोव्यातील समुद्रकिनार्यांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करणे आणि कायदा-सुव्यवस्था यांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.