अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई !
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने अमली पदार्थ तस्कार अली असगर शिराझी याच्यासह जवळच्या सहकार्यांचे जबाब नोंदवले आहेत. अमली पदार्थ तस्करीच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेट प्रकरणात मनी लाँड्रिंग आरोपाचे अन्वेषण केले जात आहे. या प्रकरणी तळोजा कारागृहात बंद असलेला विजय राणे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिराती येथे कुरिअर आस्थापनाच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे चालवत होता.
१. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंधेरीतील कुरिअर आस्थापनाच्या कार्यालयावर घातलेल्या धाडीत ७ कोटी ८ लाख रुपये किमतीचे १५.७४ किलो केटामाइन आणि ५८ लाख ३१ सहस्र रुपये किमतीच्या प्रतिबंधित औषधांच्या २३ सहस्र ४१० स्ट्रीप जप्त केल्या. विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयाच्या अनुमतीने २१ ते २३ डिसेंबर या काळात राणे यांचा जबाब नोंदवला.
२. सिंडीकेट प्रकरणाचा कैलास राजपूत हा मुख्य असून आरोपी शिराझीने त्याच्या सूचनेनुसार कारवाया केल्याचे उघड झाले. शिराझीने गुजरातमधून अमली पदार्थांची तस्करी करून ते राणे याला पाठवले. सिंडिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्या विमानतळाशी संबंधित अधिकार्यांसह अनेक व्यक्तींची ओळख उघड झाली आहे.
ईडीने मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात शिराझी, कैलाश राजपूत आणि इतरांशी संबंधित असलेल्या मुंबईतील विविध ठिकाणी धाडी घातल्या. झडती करतांना अधिकार्यांनी ५ लाख ५ सहस्र रुपयांची रक्कम आणि ५७ लाख ११ सहस्र रुपयांचे सोने जप्त केले. भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, डिजिटल उपकरणे कह्यात घेण्यात आली.