|
मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – ‘स्वच्छ मुंबई’ मोहिमेची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री येणार; म्हणून दादरमधील नायगाव येथे २ दिवस शेकडो स्वच्छता कर्मचार्यांना कामाला लावून मुंबई महानगरपालिकेने रेल्वे स्थानकापासून ते नायगावपर्यंतचे रस्ते पाण्याने धुवून काढले. रेल्वे स्थानकापासून ते नायगावच्या गल्लीबोळापर्यंत असलेल्या सर्व फेरीवाल्यांना २ दिवसांसाठी हटवण्यात आले. वर्षभर कचरा साठणार्या भागांमध्ये कचर्याच्या गाड्या पाठवून कचरा उचलण्यात आला, तसेच वर्षभर उघड्या असणार्या गटारांवर फरशा टाकून ती झाकण्यात आली. या सर्व प्रकारांची छायाचित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’ने टिपली असून यातून मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा दिखाऊपणा उघड झाला आहे.
२४ डिसेंबर या दिवशी ‘स्वच्छ मुंबई’ मोहिमेच्या अंतर्गत सकाळच्या वेळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी येथे जाऊन स्वच्छतेची पहाणी केली. त्यानंतर ते दादर येथील नायगाव येथे स्वच्छतेची पहाणी करण्यासाठी आणि एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार होते. मुख्यमंत्री येणार म्हणून २२ डिसेंबरपासून दादर रेल्वेस्थानकापासून नायगावपर्यंत असलेले फळविक्रेते, वडापावच्या हातगाड्या, छोट्या-मोठ्या किरकोळ वस्तूंच्या हातगाड्या, भाजीविक्रेते आदी पादचारी मार्गावरील सर्व फेरीवाल्यांना प्रशासनाने २ दिवसांपुरते हटवले आहे.
अशा प्रकारे करण्यात आली तात्पुरती स्वच्छता !१. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या भिंतींना रंग देण्यात आला. २. उघड्या गटारांवर तात्पुरत्या फरशा टाकून ती बंद करण्यात आली. गटारांतील गाळ यंत्राद्वारे काढण्यात आला. ३. शेकडो कर्मचार्यांकडून पादचारी मार्ग, तसेच कचर्याची ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. ४. सर्व अनधिकृत फेरीवाल्यांना हटवून पादचारी मार्ग मोकळे करण्यात आले. ५. पाणी फवारणी करणार्या यंत्राद्वारे रस्ते धुण्यात आले. |
स्वच्छता नियमित चालू असते ! – आमदार कालिदास कोळंबकर, नायगाव मतदारसंघ
नायगाव मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांना ‘अशा प्रकारे नियमित स्वच्छता ठेवण्याविषयी प्रशासनाला सांगता येईल का ?’, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘स्वच्छता नियमित चालू असते. मी करत असलेल्या कामामुळे मागील ४० वर्षे आमदार म्हणून निवडून येत आहे.’’ फेरीवाल्यांविषयी बोलतांना ते म्हणाले, ‘‘फेरीवाले गिरणी कामगार आहेत. त्यामुळे त्यांना हटवून चालणार नाही.’’
सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया !
१. रोहित सिंह, नायगाव येथील रहिवासी – मुख्यमंत्री येणार म्हणून स्वच्छता चालू आहे. अन्य वेळी येथे कचरा असतो. फेरीवाले असतात. आताची स्वच्छता पाहून आम्हाला विदेशात आल्याप्रमाणे वाटत आहे.
२. पादचारी मार्गावर भाजीविक्रेती करणारी महिला, नायगाव – मुख्यमंत्री येणार म्हणून २ दिवस आम्हाला भाजीविक्री करण्यासाठी न बसण्याची सूचना महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी दिली आहे.
३. सर्वसामान्य प्रवासी महिला – या भागातून नियमित जातांना धक्काबुक्की सहन करावी लागते. अतिक्रमणे हटवून रस्ते रिकामे केल्यामुळे आज चांगले वाटत आहे. असे वर्षभर झाले, तर चालण्यासाठी व्यवस्थित रस्ते मिळतील.
संपादकीय भूमिकाकेवळ मुख्यमंत्री येणार म्हणून स्वच्छता करणारे प्रशासन रस्ते कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी का प्रयत्न करत नाही ? |