वाफगाव (पुणे) भुईकोट गड संवर्धनासाठी ७ कोटी रुपये !

होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध !

भुईकोट गड संवर्धनाचे संकल्पचित्र

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – वाफगाव (ता. खेड) येथील भुईकोट गडाच्या संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७ कोटी २० लाख रुपयांचा निधी संमत केला आहे. होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला आहे. ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेकदिन वाफगाव येथे परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे, तेव्हापासून संवर्धन कामाला प्रारंभ होणार असल्याचे भूषणसिंह राजे यांनी सांगितले. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या बैठकीमध्ये रयत शिक्षण संस्थेने संवर्धन कार्यास संमती दिली आहे. गडामधील शाळा ही लवकरच स्थलांतरीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत; पण तोपर्यंत विद्यार्थ्यांची कोणतीही हानी होऊ न देता शाळेच्या वापरातील इमारती वगळून संवर्धन कार्यास प्रारंभ करण्यात येणार आहे.

होळकर घराण्याचे वाफगाव हे मूळ गाव, सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगावला हा भव्य भुईकोट गड उभारला. गडाचे जतन, संवर्धन व्हावे, ही लोकभावना आहे. यामुळे वाफगाव आणि परिसराचा विकास होईल, येणार्‍या पिढ्यांना तो प्रेरणा देत रहावा, यासाठी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर हे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. ते स्वतः वास्तूविशारद असून गडाच्या जीर्णोद्धाराचा आराखडा त्यांच्या चमूने सिद्ध केला आहे.