आध्यात्मिक त्रास होत असूनही महर्षींच्या आज्ञेनुसार कर्नाटकमधील हंपी येथील देवदर्शन पूर्ण करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गेल्या १२ वर्षांहून अधिक काळ भारतभरात आणि विदेशांत काही ठिकाणी प्रवास करत आहेत. या प्रवासांतर्गत विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन घेणे, तीर्थस्थळी जाणे, काही ठिकाणी यज्ञयाग करणे, आदी सेवा असतात. या सेवा महर्षींच्या आज्ञेनुसार करावयाच्या असल्याने त्यांना नेहमी वर्तमानकाळात रहावे लागते. अनेक देवस्थानांच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता कठीण असतो. अशा वेळी मिळेल तो पर्याय स्वीकारून प्रवास करावा लागतो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना देहाच्या मर्यादा असूनही अत्यंत दुर्गम ठिकाणी जाऊनही त्या भक्तीभावाने पूजाविधी करतात. साधकांच्या रक्षणार्थ सप्तर्षी सांगतील तिथे जाण्याची त्यांची सदैव सिद्धता असते. एक महिला असूनही थंडी-वारा, ऊन-पाऊस अशी कशाचीही तमा न बाळगता केवळ समष्टी कल्याणाच्या ध्यासापोटी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ देश-विदेशांत अखंड प्रवास करत असतात. या ठिकाणी महर्षींच्या आज्ञेनुसार कर्नाटक राज्यातील हंपी येथे जातांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रवासात झालेले शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् त्याच स्थितीत देवदर्शन घेतांना त्यांना आलेल्या अनुभूती पाहूया.

हंपी येथे जातांना तुंगभद्रा नदीतून होडीने जावे लागते. प्रत्यक्ष श्रीराम, हनुमान, अंजनीमाता यांना पाहिलेल्या तुंगभद्रा नदीला पाहून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा भाव जागृत झाला. त्यांनी नदीचे पाणी अंगावर प्रोक्षण करून घेतले आणि तिच्या काठावर बसून तिला भावपूर्ण नमस्कार केला.

१. हंपी येथे जातांना प्रवासात झालेले आध्यात्मिक त्रास

‘५.१.२०२१ या दिवशी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सिरसीहून हंपी येथे जायला निघालो. तेव्हा मला प्रवासात अस्वस्थ वाटू लागले. मला अनिवार ग्लानी येऊ लागली. मला डोक्यावर दाब जाणवू लागला आणि मळमळल्यासारखे होऊ लागले. त्या वेळी ‘वाईट शक्तींचे परत काहीतरी नव्याने आक्रमण करण्याचे नियोजन चालू आहे’, असे मला वाटले. आम्ही ६ घंट्यांनी होस्पेट येथे पोचलो.

शारीरिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचा त्रास होत असूनही हंपी येथे होडीतून नदी पार करून जावे लागूनही आनंदावस्थेत असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (सर्व छायाचित्रे वर्ष २०२१)

२. देवदर्शन घेण्यात आलेले अडथळे

अ. आम्ही ‘हॉटेल’मध्ये पोचताच मला पाण्यासारखे जुलाब होऊ लागले. मला दुसर्‍या दिवशीही जुलाब होतच होते. त्यामुळे महर्षींनी सांगितल्याप्रमाणे मला देवदर्शनाला जाणे शक्य झाले नाही.

आ. मला होत असलेले जुलाब तिसर्‍या दिवशी थांबले. मी प्रार्थना करून देवदर्शनासाठी बाहेर पडणार, इतक्यात माझी मासिक पाळी चालू झाली. त्यामुळे देवदर्शन लांबले. तेव्हा ‘भगवंताची इच्छा’, असे म्हणून आता मासिक पाळी संपल्यानंतर दर्शनाला जाणार आहे.

३. केलेले उपाय

या वेळी बगलामुखी कवच ऐकणे, कालभैरवस्तोत्र ऐकणे, नामजप करणे, असे उपाय चालूच होते. मला होणारे त्रास श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनाही कळवले होते.

४. महर्षींनी ‘अन्य कुणाहीपेक्षा माताजींनीच (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीच) दर्शन घेतल्याने आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणार आहे’, असे सांगणे

श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के वय ४० वर्षे) यांनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना विचारले, ‘‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची प्रकृती ठीक नाही. त्या येथेच थांबतील. त्यांच्याऐवजी आम्ही दर्शन घेऊन आलो, तर चालेल का ?’’

त्या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, ‘‘विनायकजी, जसा मी सप्तर्षी होऊ शकत नाही, केवळ त्यांचे माध्यम होऊ शकतो, तसेच हे आहे. माताजींनीच (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनीच) दर्शन घेणे आवश्यक आहे, तरच आपल्याला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होईल.’’

हंपीजवळ नववृंदावनाचे मूळस्थान असलेला श्री प्राणदेवा (श्रीमारुतिराय) या मंदिरात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना केली.

५. हंपी येथील पवित्र स्थाने

या ठिकाणी अंजनेयाद्री पर्वतावर हनुमंताचे जन्मस्थान आहे, तसेच ही रामकालीन सुग्रीवाची राजधानी किष्किंधा नगरी आहे. श्रीरामाने या ठिकाणीच वालीचा वध केला होता. शबरीचे गुरु मातंगऋषींचा आश्रमही या ठिकाणी होता. तुंगभद्रा नदीचे पवित्र जलही येथे आहे. या सर्व पवित्र स्थानी मला महर्षींनी जाऊन दर्शन घेण्यास सांगितले आहे.

६. महर्षींना केलेली प्रार्थना

मला वाटले, ‘मी दर्शनाला गेल्यानंतर परत वाटेत पोट बिघडले, तर काय करू ?’ हा परिसर डोंगराळ असल्याने वाटेत तशी कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. तेव्हा ‘महर्षीच आता मला शक्ती देतील’, असे मला वाटले. त्या वेळी मी महर्षींना प्रार्थना केली, ‘तुम्हीच मला आता दर्शनासाठी जाण्याची शक्ती द्या.’

अशा प्रकारे धर्मकार्यात वाईट शक्तीही शारीरिक त्रास देत असतात; परंतु भगवंताला सर्व ठाऊक असल्याने मधल्या कालावधीत आमची टंकलेखनाची सेवा चालू असते. अन्य वेळीही दौर्‍यात असतांना मला प्रवासात अनेक वेळा असे शारीरिक त्रास होऊनही देवाने माझ्या सेवेत कधीच खंड पडू दिलेला नाही. ही त्याचीच कृपा नाही का ?’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, होस्पेट, कर्नाटक. (२८.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]