श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, म्हणजे देवीतत्त्वाची अनुभूती देणारे आणि भगवंताच्या चैतन्यशक्तीच्या रूपात पृथ्वीवर अवतरलेले कमलपुष्पच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी अवतरलेल्या भगवंताच्या चैतन्यशक्तीचा प्रगटदिन ! 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. देवीसमान तेजस्वी आणि आनंदी

देवीसमान अत्यंत तेजस्वी कांती असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य साधकांना आश्वस्त करते. त्यांचे निखळ हास्य, म्हणजे साधकांवर आनंदाची उधळण करणारा जणू झराच ! संत तुकाराम महाराज यांच्या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, या अभंगाची स्वतः अनुभूती घेणार्‍या आणि स्वतःच्या अस्तित्वाने इतरांनाही ती अनुभूती देणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ, म्हणजे आनंदमूर्तीच !

२. गुरुदेवांच्या मनातील प्रत्येक विचार कृतीत आणणार्‍या आणि चैतन्याच्या बळावर अफाट कार्य करत असूनही अहंशून्य असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ !

श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्वस्वरूप असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ गुरुदेवांच्या मनातील प्रत्येक विचार कृतीत आणतात. स्वतःतील दैवी चैतन्यामुळे अखंड कार्यरत राहून गुरुसेवा करणार्‍या चैतन्यस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या अस्तित्वाने अथवा केवळ त्यांच्या आठवणीनेही साधकांना आध्यात्मिक चेतना मिळते ! श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ अफाट कार्य करत असूनही ‘हें मजचिस्तव जाहलें । परि म्यां नाहीं केलें । (म्हणजे हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही)’, या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीप्रमाणे त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नाही.

३. भगवंत श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पहाण्यासाठी आतुर झालेला असतो !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या सप्तर्षींच्या आज्ञेनुसार देश-विदेशांतील विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन करतात आणि देवाला हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी प्रार्थना करतात. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा गौरव करतांना सप्तर्षी म्हणतात, ‘एरव्ही कार्तिकपुत्रीला (टीप) देवाचे दर्शन घ्यायचे असते; पण आता देवाला कार्तिकपुत्रीला पहायचे आहे’, म्हणजे साक्षात् भगवंत श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पहाण्यासाठी आतुर झालेला असतो !

टीप – श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सप्तर्षी ‘कार्तिकपुत्री’ या नावाने संबोधित करतात.

४. जागृत देवीतत्त्व आणि वाणीतील चैतन्य यांमुळे अनेकांना साधना करण्यास प्रवृत्त करणारी चैतन्यमूर्ती !

अनोळखी व्यक्तीही श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पाहून हात जोडून नमस्कार करतात. त्यांच्यातील जागृत देवीतत्त्वाचा आणखी कोणता पुरावा द्यावा ? विविध ठिकाणी गेल्यावर त्या तेथील लोकांना साधनेचे महत्त्व सांगतात. त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे समाजातील अनेक लोक साधनेला लागले आहेत अन् अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी झाले आहेत.

५. प्रत्येकात भगवंताचे रूप पाहून प्रीतीच्या वर्षावात न्हाऊ घालणारी वात्सल्यमूर्ती !

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।।’ (म्हणजे जो जो प्राणी (भूत) दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे’, असे समजावे.) या ओवीप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा ‘चराचरात परमेश्वर आहे’, असा भाव असल्याने त्या केवळ साधकांमध्येच नव्हे, तर समाजातील लोकांमध्येही ईश्वराचे रूप पहातात आणि त्यांना आपल्या प्रीतीच्या अमृतमय वर्षावात न्हाऊ घालतात.

६. पृथ्वीवर छायारूपाने वास करणारी आदिशक्ती जगदंबा !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची प्रत्येक कृती आणि विचार यांतून त्यांच्यातील देवीतत्त्व झळकते. त्या महालक्ष्मीस्वरूप आहेत, तसेच ज्ञानप्रदायिनी सरस्वतीचे तत्त्वही त्यांच्यात कार्यरत आहे. त्यांच्या रूपात या भूतलावर जणू आनंददायिनी आणि ज्ञानस्वरूपिणी देवीचे रूप प्रत्यक्ष अवतरले आहे. सप्तर्षींनीही ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या माध्यमातून पृथ्वीवर साक्षात् आदिशक्ती जगदंबा छायारूपाने वास करत आहे’, या गौरवोद्गारांच्या माध्यमातून त्यांचे यथार्थ वर्णन केले आहे.

धन्य त्या भक्तशिरोमणी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि धन्य त्यांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातील चैतन्यस्वरूप देवीतत्त्वाला आम्हा सर्वांचे कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (६.१२.२०२३)