अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीरामंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री राममललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे. हा मुहूर्त भारतासाठी संजीवन म्हणून काम करणार आहे. यामुळे भारताला विश्वगुरू बनण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या मुहूर्ताच्या वेळी ग्रहांची अनुकूलता संपूर्ण भारतासाठी लाभदायक ठरणार आहे.
१. काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी आणि श्रीराममंदिराच्या पायाभरणीसाठी शुभमुहूर्त ठरवणारे पंडित गणेशवरशास्त्री द्रविड म्हणाले की, अभिजित मुहूर्तावर श्रीरामजन्मभूमीत श्री रामललाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी अत्यंत सूक्ष्म शुभमुहूर्त आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिट ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिट ३२ सेकंदांपर्यंतचा हा ८४ सेकंदाचा मुहूर्त असणार आहे. या अभिजित मुहूर्तावर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा केल्याने रामाचे राज्य वाढेल, म्हणजेच श्रीरामाच्या धोरणानुसार राज्यकारभार चालेल.
२. पं. अरुण दीक्षित यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात इतर कोणतीही पूजा चुकू नये, यासाठी धर्मग्रंथांच्या अभ्यासासमवेतच देशभरातील अभ्यासकांशी संपर्क साधला जात आहे. श्री रामललाच्या अभिषेकासाठी अयोध्येत ८ प्रकारचे मंडप बांधण्यात येणार आहेत. काशीहून अयोध्येला येणारे वैदिक लोक चारही वेदांचे पठण करतील. यासमवेतच १०८ कलश पंचगव्य, १० प्रकारच्या समिधा, सहस्रछिद्राभिषेकासाठी घट, तीर्थक्षेत्रांचे जल, नवरत्न, पंचरत्न, पारा आणि सप्तधान्यय काशीहून अयोध्येत पाठवले जाणार आहेत.
१६ जानेवारीपासून विधींना प्रारंभ होणार !
पं. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील १२१ वैदिक ब्राह्मण प्राणप्रतिष्ठा मुहूर्त साधणार आहेत. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य शंकर जयेंद्र सरस्वती यांनी यासाठी त्यांची निवड केली आहे. १६ जानेवारीला शरयू नदीतील मूर्तीच्या नौकानयनाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी देवाची मूर्ती शहराच्या भ्रमणासाठी नेण्यात येणार आहे. १७ जानेवारीला श्री गणेशपूजन करण्यात येईल. २२ जानेवारीला अभिजित मुहूर्तावर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.