चिपळूण (रत्नागिरी) येथील श्री क्षेत्र परशुराम येथे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ‘मंदिर विश्वस्त बैठक’

मंदिरांचे संघटन आणि मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे ध्येय महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून साध्य होईल ! – विश्वस्तांचा विश्वास

चिपळूण, २२ डिसेंबर (वार्ता.) : महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर संस्कृतीवर निधर्मी शासन व्यवस्थेत होणारे आघात रोखण्यासाठी आणि व्यवस्थापन करतांना येणार्‍या समस्यांवर उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने सर्वांना समवेत घेऊन चालू केलेल्या प्रक्रियेतून भविष्यात मंदिरांचे संघटन आणि मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे ध्येय साध्य होईल, असा विश्वास मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला.

बैठकीत मागदर्शन करतांना श्री. विनय पानवळकर आणि उपस्थित मान्यवर

महाराष्ट्र मंदिर महासंघ करत असलेले कार्य आणि वर्षभरात मिळालेले यश मंदिर विश्वस्तांपर्यंत पोचावे, या उद्देशाने १८ डिसेंबर या दिवशी येथील भगवान परशुराम मंदिराच्या सभागृहात तालुक्यातील मंदिर विश्वस्तांची बैठक झाली. या बैठकीचा प्रारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर उपस्थित विश्वस्तांनी भगवान परशुरामांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. बैठकीचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सचिन सकपाळ यांनी केले. बैठकीची प्रस्तावना समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केली.

बैठकीत जळगाव आणि पुणे येथे झालेल्या  मंदिर परिषदेच्या कार्यक्रमाची ‘ध्वनीचित्रफीत’ दाखवण्यात आले, तसेच परिषदेत सहभागी झालेल्या विश्वस्तांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मंदिरांचे मजबूत संघटन निर्माण झाल्यास समस्या सुटण्यास साहाय्य होईल ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र मंदिर महासंघ ‘मंदिरांचे मजबूत संघटन निर्माण होणे, मंदिरांमध्ये आपापसांतील समन्वय उत्तम प्रकारे साधला जाणे, मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे असणे, मंदिरांच्या सुरक्षेसाठी विविध संकल्पना राबवणे आणि मंदिरे ही सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होणे’, या पंचसूत्रीनुसार राज्यभर कार्यरत झाला आहे. प्रशासकीय आणि ग्रामस्तरावर मंदिरांच्या व्यवस्थापनाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. मंदिरांचे मजबूत संघटन निर्माण झाल्यास मंदिरांच्या समस्या सुटण्यास साहाय्य होईल.

हिंदूंना धर्मशिक्षित करण्याचे दायित्व मंदिरांचे आहे ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरे ही धर्माची दिशा देणारी केंद्रे आहेत. पूर्वी मंदिरातून धर्मशिक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य होत असे; मात्र आता ते होत नसल्याने हिंदु समाज धार्मिकदृष्ट्या दिशाहीन झाला आहे. हिंदूंना धर्मशिक्षित करण्याचे दायित्व मंदिरांचे असून त्यासाठी मंदिरांना पुढाकार घ्यावा लागेल.

मंदिर विश्वस्तांनी संघटित होणे आवश्यक ! – ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, श्री भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्वस्त

बैठकीचा समारोप करतांना संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे म्हणाले की, महाराष्ट्र मंदिर महासंघाची पुणे येथील परिषद ‘न भूतो न भविष्यती’ अशी झाली. मंदिरे ही धर्माचे अधिष्ठान आहे. धर्म टिकवण्याचे, तसेच प्राणप्रतिष्ठापना झालेल्या मूर्तीतील चैतन्य, तेजशक्ती वाढवण्याचे कार्य भगवंताने विश्वस्त म्हणून आपल्याकडे दिले आहे. वर्ष २००८ मध्ये महाराष्ट्रातील ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा सरकारचा डाव मंदिरे संघटित होऊन राज्यभर आंदोलन झाल्याने शासनाला तो आदेश मागे घ्यावा लागला. मंदिर विश्वस्तांनी एकत्र यायला हवे. महासंघाद्वारे जिल्हास्तरीय मंदिर परिषद घेऊन संघटित शक्ती निर्माण होईल.

मनोगत

१. श्री. अमोल वारे, सचिव, श्री कामधेनु मंदिर, पेढे, ता. चिपळूण : महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुणे येथे झालेल्या मंदिर परिषदेतून खूप प्रेरणा मिळाली. थोडा वेळ हिंदु धर्मासाठी दिला पाहिजे, याची जाणीव झाली. ‘भविष्यात मोठी संकटे आपल्यासमोर उभी राहू शकतात’, याची जाणीव समिती करून देत आहे.

२. श्री. गजानन भोसले, अध्यक्ष, श्री देव धावजी देवस्थान, पेढे, परशुराम : पुणे येथे झालेल्या मंदिर परिषदेत विचार ऐकल्यावर आम्ही कुठे आहोत ? हे समजले. मी गावात आल्यावर लोकांना ते विचार सांगितले. या कार्यात सहभागी झालो, तर समिती निश्चित सोबत रहाते. मंदिराचे कार्य पहातांना स्वच्छ, पारदर्शक विचार ठेवणे, आम्ही सेवेकरी आहोत, असा भाव ठेवला, तर मंदिरे पुढे जातील. धर्मकार्यात सहभाग घेतल्यावर देव अनुभूतीही देतो.

३. श्री. कृष्णा पंडित, अध्यक्ष, श्री शारदादेवी मंदिर, तुरंबव : देव रहाटीतील भूमीवर काही बांधकाम करायचे झाल्यास शासनाची अनुमती मिळत नाही. मंदिर महासंघाच्या रूपाने बहुमूल्य व्यासपीठ निर्माण झाले आहे. आपण यांच्याशी समन्वयाने राहूया. या कार्यात सहभागी झालो, तर ऊर्जा मिळते.

४. श्री. चंद्रकांत कदम, अध्यक्ष, श्री भवानी वाघजाई मंदिर, टेरव : महासंघाच्या या उपक्रमातून सर्वांनी स्फूर्ती घेऊया. गावागावांतील समस्यांविषयी मंदिर महासंघाने विचार करावा. गावात बैठका घेऊया. आम्ही सहकार्य करू. धर्म म्हणून एक यायला हवे.

५. श्री. गंगाराम इप्ते, श्री भैरी चंडकाई  ग्रामदैवत, असगणी, ता. खेड : भक्तीचा महिमा गावागावात तरुणांपर्यंत पोचवण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून बैठका घेऊ या.

६. श्री. दीपक साळवी, श्री सुकाई देवस्थान, कापसाळ : हिंदु धर्मासाठी कार्य करणार्‍या मंदिर महासंघाच्या कार्यात तरुणवर्ग अधिकाधिक सहभागी होईल, यासाठी प्रयत्न करूया.

७. श्री. जगन्नाथ सुर्वे, संस्थापक-अध्यक्ष, श्री भैरी भवानी देवस्थान, शृंगारपूर, ता. संगमेश्वर : मंदिर महासंघाच्या कार्यात अखंड हिंदुस्थानचा विचार आहे. धर्मशिक्षण देण्यासाठी मंदिरांचा सदुपयोग करायला हवा. २ वर्षांपूर्वी वस्त्रसंहिताची कुणाला माहिती नव्हती; मात्र आज जिल्ह्यात ५५ मंदिरात वस्त्रसंहितेचे फलक लागले आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात जातीचा उल्लेख नसतो. सनातन आपण सगळे हिंदु आहोत असा उल्लेख करते; मात्र राजकीय क्षेत्रातून जातीपातीचा विचार निर्माण होतो.

बैठकीत कृती करण्याची ठरलेली सूत्रे !

१. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हास्तरीय मंदिर परिषद घेण्याचा विश्वस्तांनी निर्धार व्यक्त केला.

२. ‘तीर्थस्थळ, मंदिर, धार्मिक स्थळ आदींचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांचे परिसर ‘मद्य-मांस’ मुक्त करा !’ या विषयाचे निवेदन प्रत्येक देवस्थानने त्यांच्या ‘लेटरहेड’वर लिहून माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्याचे ठरले.

३. विश्वस्तांनी वस्त्रसंहिता फलक आणि धर्मशिक्षण फलकांची मागणी केली.

४. गावागावांत बैठका घेऊन मंदिर महासंघाचे कार्य पोचवण्याचे ठरले.

विशेष

श्री परशुराम देवस्थानच्या वतीने बैठकीसाठी लागणारी सर्व व्यवस्था आणि महाप्रसादाची व्यवस्था केली, तसेच आलेल्या विश्वस्तांचा भगवान परशुरामाची प्रतिमा आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२४’ भेट देण्यात आले.

बैठकीतील उपस्थित मान्यवर !

बैठकीला उपस्थित मंदिरांचे विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ

या बैठकीत श्री विंध्यवासिनी देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश पोंक्षे, तुरंबव येथील श्री शारदादेवी देवस्थानचे खजिनदार श्री. दत्तात्रय पंडित, संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्वस्त श्री. प्रशांत पटवर्धन, श्री. जयदीप जोशी, निरबाडे येथील श्री रामवरदायिनी देवस्थानचे श्री. नंदकुमार महाडिक, मेटे येथील श्री झोलाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. दत्ताराम मोगरे, कापसाळ येथील श्री सुकाई देवस्थानचे श्री. दीपक साळवी, टेरव येथील श्री विश्वकर्मा मंदिराचे श्री. भिकाजी वास्कर, खडपोली येथील श्री सुकाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुभाषराव शिंदे, गांग्रई येथील श्री विठ्ठल मंदिराचे ह.भ.प. शांताराम गावणंग, बिवली-करंबवणे येथील श्री वाघजाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. मंदार केतकर, धामणदेवी श्री काळेश्वरी देवस्थानचे सचिव ह.भ.प. राजेंद्र बाचिम, तिवरे येथील श्री व्याघ्राम्बरी देवस्थानचे श्री. पांडुरंग शिंदे, आंबडस येथील श्री गरजाई वाघजाई काळकाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. रवींद्र मोरे, सदस्य श्री. महादेव दळवी, कान्हे येथील श्री काळेश्री देवस्थानचे श्री. गणपत मोडक, गुढे येथील श्री केदारनाथ देवस्थानचे श्री. तुकाराम जड्याळ, अडरे येथील मंदिराचे श्री. दत्ताराम तांदळे, खेर्डी येथील सुकाई देवस्थानचे श्री लक्ष्मण भुरण, आसुर्डे येथील श्री सुकाई देवस्थानचे श्री सूर्यकांत खेतले यांसह ४२ विश्वस्त उपस्थित होते.