श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली दैवी सूत्रे आणि त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘सनातनच्या साधकांचे भाग्य थोर म्हणून त्यांना प्रत्यक्ष श्रीविष्णूचा अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्री महालक्ष्मीचा अवतार असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे गुरुरूपात लाभले आहेत. साधकांना त्यांचे सगुण रूपात दर्शन आणि मार्गदर्शन मिळत आहे. आपण आतापर्यंत त्यांच्या अनेक गुणांचे वर्णन दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वाचले आहे. त्यांच्या अस्तित्वाने, दर्शनाने, त्यांच्याशी बोलल्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे साधकांमध्ये आमूलाग्र पालट घडत आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात आलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने येथे मांडत आहे. (भाग १)

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्याने पूर्णवेळ साधना करण्यातील अडथळा दूर होणे

१ अ. नोकरीचे त्यागपत्र लिहून दिल्यावर ते स्वीकारण्याच्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागणे : वर्ष २००३ मध्ये मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. ७.८.२००३ या दिवशी मी नोकरीचे त्यागपत्र लिहून कार्यालयात दिले; परंतु ते स्वीकारण्याच्या संदर्भातील प्रक्रिया पुढे जात नव्हती. ज्या ज्या अधिकार्‍यांकडे ते पत्र जात होते, ते मला बोलावून ‘मी किती वेडेपणा करत आहे ! जीवनातला किती अयोग्य निर्णय घेतला आहे !’, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि मला त्यागपत्र देण्यापासून परावृत्त करत होते. यात पुष्कळ वेळ वाया जात होता.

१ आ. पूर्णवेळ साधना करण्यातील अडथळे दूर होण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एक नामजप करण्यास सांगणे : याच कालावधीत मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेलो होतो. तेथे सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्याशी माझी भेट झाली. तेव्हा मी त्यांना माझे नोकरीचे त्यागपत्र स्वीकारण्यात येत असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यांनी मला सांगितले, ‘‘एखाद्या साधकाने पूर्णवेळ साधना करण्यात वाईट शक्ती अनेक अडथळे आणतात. तुम्ही काळजी करू नका !’’ त्यांनी मला या समस्येवर उपाय म्हणून एक नामजप करण्यास सांगितला. मी तो नामजप चालू केला.

 १ इ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप चालू असणे आणि अंतिम निर्णय घेणार्‍या अधिकार्‍याने अकस्मात् ‘त्यागपत्र संमत करून घेतो’, असे सांगणे : त्यानंतर माझे त्यागपत्र एका महत्त्वाच्या अधिकार्‍याकडे अंतिम निर्णयासाठी गेले. तेव्हा त्यांनी मला बोलावून ‘माझा निर्णय अयोग्य कसा आहे ?’, हे सांगण्यास आरंभ केला; परंतु त्या वेळी काही ना काही अडथळे येऊन आमचे बोलणे अपूर्णच रहात होते. तेव्हा माझा सौ. गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप चालूच होता. तेव्हा ते अधिकारी अकस्मात् मला म्हणाले, ‘‘तुम्ही जा. मी तुमचे त्यागपत्र संमत करून घेतो’’ आणि माझा पूर्णवेळ साधना करण्यातील मोठा अडथळा दूर झाला.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्वतः करत असलेले भावजागृतीचे प्रयोग सांगणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न केल्याने अनेक साधकांना लाभ होणे

२ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितलेले भावजागृतीचे प्रयोग : वर्ष २००५ मध्ये सौ. गाडगीळ मुलुंड (मुंबई) येथे त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा अंजलीताईंनी आम्हाला सांगितले, ‘‘मी प्रत्येक प्रसंगात भावजागृतीचे प्रयत्न करते, उदा. आसंदीवर बसण्यापूर्वी ‘तेथे आधी परात्पर गुरु डॉ. आठवले बसले होते. आता मी बसत आहे’, असा भाव ठेवते. प्रसाधनगृहात गेल्यावर तेथील रज-तमात्मक वातावरणाचा त्रास होऊ नये; म्हणून मी तेथे जाण्यापूर्वी ‘देवतांची शस्त्रे जाऊन तेथील सर्व त्रासदायक शक्ती दूर करत आहेत’, असा भाव ठेवते.’’

२ आ. सौ. गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे भावजागृतीचे लहान लहान प्रयत्न केल्याने दिवसभरात सेवा करायला आनंद आणि उत्साह मिळणे : त्या वेळी मी भावजागृतीसाठी सकाळी आरती झाल्यावर मानसपूजा करायचो; परंतु ‘अंजलीताईंनी सांगितलेले हे लहान लहान भावजागृतीचे प्रयत्न आपण दिवसभर करू शकतो’, असे माझ्या लक्षात आले. त्यांच्या प्रेरणेने मला भावजागृतीचे अनेक लहान लहान प्रयत्न सुचू लागले. त्या प्रयत्नांतून मला दिवसभरात सेवा करायला पुष्कळ आनंद आणि उत्साह मिळत असे.

सूक्ष्म ज्ञान मिळण्याची दैवी प्रक्रिया

दिवसभरात असे अनेक भावजागृतीचे प्रयोग करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला ‘हे भावजागृतीचे प्रयोग सर्वांपर्यंत पोचवावेत’, अशी प्रेरणा दिली. त्यानंतर मी मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये साधकांसाठी २ घंट्यांचे भावजागृतीच्या प्रयोगांविषयीचे सत्संग घेतले. ते सत्संग साधकांना पुष्कळ आवडायचे. या सत्संगांमुळे ‘भावजागृतीचे प्रयोग करणे एवढे सोपे असते’, हे त्यांच्या लक्षात आले.

३. ‘आश्रमाचा परिसर चैतन्यमय आणि सुंदर दिसायला हवा’, अशी तळमळ असणे

वर्ष २०१२ मध्ये अंजलीताई देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी आश्रमात जागा अल्प असल्यामुळे प्रसारासाठी छापलेले ‘सनातन पंचांग’, वह्या आणि इतर साहित्य यांचे खोके अगदी दर्शनी भागातच ठेवलेले असायचे. त्यांचे ऊन-पावसापासून रक्षण होण्यासाठी तेथे एक तात्पुरती शेड बांधली होती. ‘या जागेला काहीतरी पर्याय असायला हवा’, हे आमच्या कुणाच्याही लक्षात आले नव्हते. अंजलीताई आल्या आणि त्यांनी सांगितले, ‘‘आश्रमाच्या दर्शनी भागात साहित्य ठेवलेले चांगले दिसत नाही.’’ त्यांनी तातडीने निर्णय घेऊन ही शेड आणि साहित्य अन्य ठिकाणी हालवण्यास सांगितले. त्यामुळे आश्रमाच्या दर्शनी भागातील परिसर चैतन्यमय आणि सुंदर दिसू लागला.

४. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी साधकांच्या समवेत नामजप केल्यावर साधकांचे आध्यात्मिक स्तरावरील त्रास न्यून होणे

अंजलीताई देवद आश्रमात आल्यावर साधकांच्या समवेत नामजप करायच्या. मलाही त्यांच्या समवेत नामजपाला बसण्याची संधी लाभली. नामजप करतांना अंजलीताईंचे रूप साक्षात् देवीसारखे दिसायचे. त्या वेळी मला ‘देवीचे रौद्र रूप प्रगट झाले आहे’, असे वाटायचे. नामजप करतांना त्या वेगवेगळ्या मुद्रा करत असत. त्या कधी हातात त्रिशूळ घेतल्याप्रमाणे, तर कधी बोटात सुदर्शनचक्र असल्याप्रमाणे हातांच्या बोटांच्या मुद्रा करायच्या, तर कधी हाताची आशीर्वादाची मुद्रा करायच्या. त्या वेळी मला ‘त्यांच्या हातातून सूक्ष्मातून शस्त्रास्त्रे सुटत आहेत’, असे वाटायचे. त्यांचे रौद्र रूप पाहून साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींना पुष्कळ त्रास होत असे आणि साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून होत असे.

(‘वरील सूत्रे महर्षींनी सौ. अंजली गाडगीळ यांचे ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’, असे नामकरण करण्यापूर्वीची आहेत. त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘सौ. अंजली गाडगीळ’, असा केला आहे.’ – संकलक)                                         (क्रमशः)

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.११.२०२३)

सूक्ष्म ज्ञान मिळण्याच्या दैवी प्रक्रियेविषयी सांगणे

वर्ष २००५ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ठाणे जिल्ह्यात अंजलीताईंचे ‘सूक्ष्म ज्ञान कसे मिळते ?’, याविषयीचे अभ्यासवर्ग झाले. प्रश्न वाचल्यावर अंजलीताईंना सूक्ष्मातून त्याचे उत्तर सुचायचे. लगेच त्यांच्या हातांची बोटे संगणकाच्या कळफलकावर गतीने फिरायची अन् ताई त्या प्रश्नाच्या उत्तराचे टंकलेखन करायच्या. आम्हा सर्व साधकांमध्ये सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याच्या दैवी प्रक्रियेविषयी पुष्कळ उत्सुकता आणि कुतूहल होते. आमची ही इच्छा त्यांच्या या अभ्यासवर्गामुळे पूर्ण झाली. कोणत्याही विषयासंबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ लगेच संगणकावर टंकलिखित करत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली काही अनमोल सूत्रे !

१. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा संस्कार होणे

‘साधकाची जसजशी आध्यात्मिक प्रगती होते, तसतसे त्याच्या जीवनातील सर्वकाही देवाशी जोडले जाऊ लागते. ‘देव एके देव’ एवढेच शेष रहाते. बहुतेक लोक विचारांच्या पातळीला बराच काळ रहातात. त्यांच्याकडून साधनेची कृती होत नाही. केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, असे म्हटले जाते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे निर्मूलन करून अंतर्मन शुद्ध करून अंतरातील देवाला प्रदक्षिणा घालायला शिकवणे

२ अ. ‘तीर्थक्षेत्रांना भेटी देणे, व्रत-वैकल्ये करणे, पवित्र ठिकाणांना प्रदक्षिणा घालणे’, यामुळे काही जणांना काही प्रमाणात आध्यात्मिक लाभ होणे : बरेच जण त्यांच्या जीवनात तीर्थक्षेत्रांना भेटी देतात आणि तेथे जाऊन काही व्रत-वैकल्ये करतात, तर काही जण उपासनेचा एक भाग म्हणून तेथील पवित्र पर्वतांना प्रदक्षिणा घालतात, उदा. मथुरेतील गोवर्धन पर्वताची परिक्रमा, चित्रकूट येथील कामदगिरीची परिक्रमा, तिरुवण्णमलयै येथील अण्णामलई पर्वताची परिक्रमा इत्यादी. यामुळे त्यांना काही प्रमाणात आध्यात्मिक लाभही होतो.

२ आ. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे निर्मूलन केल्यास ईश्वराचे मूळ घर असलेले ‘अंतर्मन’ घडून खर्‍या अर्थाने साधना होणे : व्रत-वैकल्ये आणि परिक्रमा यांच्या समवेतच ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परिक्रमा करण्याने केवळ देह झिजतो; पण ईश्वराचे मूळ घर असलेले ‘अंतर्मन’ घडत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ईश्वरप्राप्तीसाठी लाभदायक ठरणारी ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली आहे. या प्रक्रियेने जिवाच्या अंतर्मनावर जन्मोजन्मी झालेले मायेतील आणि ‘स्वभावदोष अन् अहं’ यांचे संस्कार नष्ट होतात. त्यामुळे जिवाला ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे शक्य होते. खरेतर, देवाला ही अंतर्मनाच्या शुद्धीची परिक्रमा करणेच अपेक्षित आहे.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणे’, हीच खरी शुद्ध अंतःकरणातील देवाला घातलेली प्रदक्षिणा असणे : केवळ देह झिजवण्यापेक्षा देवासाठी मन-बुद्धी झिजवून अंतरात भगवंताचे स्थान निर्माण केले पाहिजे. ‘अंतरातील देवाला प्रदक्षिणा घालणे’, ही खरी साधना आहे. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणे’, हीच खरी शुद्ध अंतःकरणातील देवाला साधकांनी घातलेली साधनेतील प्रदक्षिणा आहे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (६.१२.२०१६)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.