श्री महालक्ष्मी मंदिराच्‍या दुरुस्‍तीसाठी ९३ कोटी रुपयांचा आराखडा ! – विलास वहाणे, साहाय्‍यक संचालक, पुरातत्‍व विभाग

कोल्‍हापूर – मनकर्णिका कुंड आणि नगारखान्‍याच्‍या दुरुस्‍तीसाठी पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीकडून निधी उपलब्‍ध करून दिला आहे. या संदर्भातील निविदाही पुरातत्‍व विभागाच्‍या वतीने प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. लवकरच कुंडाचे गतवैभव मिळवून देण्‍याचे काम चालू होईल आणि ते भाविकांना खुले करून दिले जाईल. श्री महालक्ष्मी मंदिराचे व्‍यवस्‍थापन आणि दुरुस्‍ती यांसाठी कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी यांनी पुरातत्‍व विभागाकडे पत्रव्‍यवहार केला होता. पुरातत्‍व विभाग एक वास्‍तूविशारद नेमून सुंदर आराखडा सिद्ध करत आहे. त्‍याचप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिराच्‍या दुरुस्‍तीसाठी ९३ कोटी रुपयांच्‍या निधीची मागणी जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या वतीने केंद्रशासनाकडे करण्‍यात आली आहे. या सर्व गोष्‍टींचा पूर्तता झाल्‍यावर एक-दोन वर्षांत श्री महालक्ष्मी मंदिराचे रूप पालटून त्‍याला प्राचीन वारसा लाभेल, अशी माहिती पुरातत्‍व विभागाचे साहाय्‍य संचालक विलास वहाणे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.

विशाळगडाच्‍या सुशोभिकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी संमत !

राज्‍यातील गड-दुर्गांच्‍या सुशोभिकरणासाठी महाराष्‍ट्र शासनाने मोठा निधी उपलब्‍ध करून दिला आहे. यात प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हा नियोजन समितीमध्‍ये पुरातत्‍व विभागासाठी ३ टक्‍के राखीव निधी ठेवण्‍यात आला आहे. हा निधी जवळपास ४५० कोटी रुपये इतका होतो. तसेच शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ३५० व्‍या राज्‍याभिषेकदिनाच्‍या निमित्ताने वेगळा निधीही विभागाला दिला आहे. त्‍यामुळे शिवकालीन गडांच्‍या सुशोभिकरणासाठी जवळपास १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध आहे. आता महाराष्‍ट्रातील जवळपास प्रत्‍येक गडावर सुशोभिकरणाची कामे चालू असून विशाळगडाच्‍या सुशोभिकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळाला आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍याचीही महत्त्वाची भूमिका सांस्‍कृतिक मंत्र्यांनी घेतली आहे. हा विषय सध्‍या उच्‍च न्‍यायालयात असल्‍यामुळे प्रलंबित आहे.