सांगली – ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारत देशाची जगाप्रती असणारी धारणा आहे. प्रत्येक राष्ट्राला एक धर्म असतो. तो टिकवण्यासाठी त्यातील नागरिकांनी सतत प्रयत्नशील असावे लागते. सध्याची जागतिक परिस्थिती पहाता ज्याची मुळे भारतात आहेत, त्या सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ‘लोकमान्य टिळक स्मारक मंदिर शताब्दी सोहळ्या’च्या निमित्ताने चिंतामण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा काळे, श्री. प्रकाश बिरजे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
१. आपण ज्या वेळी ‘स्वराज्य’ हा शब्द उच्चारतो त्यामध्ये असणारा ‘स्व’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कित्येकांना ‘स्व’ ची ओळख नसते. प्रत्येकातील ‘स्व’जागृत करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले.
२. कित्येक जण म्हणतात की, भगवद़्गीता आयुष्याच्या उत्तरार्धात वाचावी; परंतु जीवनाला दिशा देण्याचे कार्य गीता करते. सर्व उपनिषदांच्या चिंतनाचा परिपाक म्हणजे गीता आहे. त्यामुळे गीता युवा पिढीने वाचली पाहिजे.
३. आज जगाचे लक्ष्य भारताकडे आहे. भविष्यात भारत विश्वगुरु बनलेला आपल्याला पहावयास मिळेल. देश परमवैभवाला नेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. निरामय विश्व निर्माण करण्याचे दायित्व नियतीने भारतावर सोपवले आहे. त्यासाठी प्रयत्नशील रहाणे म्हणजेच आपली प्रत्येक कृती देशहिताचीच राहील, या दृष्टीकोनातून वाटचाल करणे, हे आपले दायित्व आहे.
भगवद़्गीतेत जीवनाचे तत्त्वज्ञान ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
भगवद़्गीतेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. आपले कार्य करतांना जन्म-मृत्यूची भीती बाळगू नये. जगात शांती नांदावी म्हणून अनेकांनी विविध प्रयत्न केले; परंतु त्यातून ठोस परिणाम दिसू शकला नाही. या विविध प्रयोगांमुळे कट्टरतेमध्ये वाढ होत आहे. मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसा थांबलेली नाही. व्यक्तीकेंद्रित किंवा समाजकेंद्रित जीवनशैली अंगीकारल्यामुळे आज जग अस्थिर आहे. गीतेत सांगितल्यानुसार व्यक्ती आणि समाज या दोघांना सामावून घेणार्या सनातन धर्माची तहान जगाला आज लागलेली आहे. |