गोव्यात पुढील ३ महिन्यांत ३ सहस्र ५०० मुंडकारांची (कुळांची) घरे त्यांच्या नावावर होणार !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) : गोव्यातील ३ सहस्र ५०० मुंडकारांविषयीच्या (कुळांविषयीच्या) खटल्यांमध्ये लवकर निर्णय देण्यासाठी सरकारने पावले उचलली असून वर्ष १९७० पूर्वी घरे बांधलेल्या सर्व मुंडकारांना ते रहात असलेले घर आणि आजूबाजूची जागा मिळून ३०० चौरस मीटर भूमी मिळणार आहे. ही भूमी मुंडकारांच्या नावावर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘सर्व मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी यांना मुंडकारांविषयीची प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणांमध्ये घर हे मुंडकारांच्या नावावर आहे; परंतु घर असलेली भूमी ही जमीनदाराच्या (भाटकाराच्या) नावावर आहे. यासंबंधीच्या प्रकरणांचा आढावा घेतला असता उत्तर गोव्यात अशी २०० प्रकरणे, तर दक्षिण गोव्यात १५०० प्रकरणे असल्याचे आढळून आले आहे. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी संबंधित अधिकारी शनिवारी त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. ३०० चौरस मीटर भूमी मुंडकाराच्या नावावर हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी मुंडकाराचे घर वर्ष १९७० पूर्वी बांधलेले असावे आणि त्याच्या नावावर घराची नोंदणी झालेली असावी, तसेच त्याचे नाव १/१४ च्या उतार्‍यावर, वीजदेयक आणि पाण्याचे देयक यांवर असायला हवे. मतदारसूचीमध्ये त्याचे नाव असले पाहिजे.

वरीलपैकी कोणतेही कागदपत्र असल्यास मुंडकार घर त्याच्या नावावर करण्याविषयीची प्रक्रिया करू शकेल. यासाठी खरेदीचा आदेश संमत करण्याचा अधिकार मामलेदारांना देण्यात आला आहे. एकदा खरेदी आदेश सिद्ध झाला आणि पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की, सनद देण्यात येईल. त्यानंतर घर मुंडकाराच्या नावावर करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. काही ठिकाणी मुंडकारांची कित्येक वर्षे जुनी घरे जमीनदारांनी पाडली आहेत आणि ही प्रकरणे न्यायालयात आहेत. ’’