स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही हिंदूंच्या समस्यांची सूची मोठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

मिरज येथील हिंदूसंघटन मेळाव्यासाठी १५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती !

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, तसेच कु. प्रतिभा तावरे

मिरज – ‘लोकशाहीमध्ये ज्याचे बहुमत त्याची सत्ता’, असे सांगितले जाते; परंतु राज्यघटनेतील कलम ३० अंतर्गत अल्पसंख्यांकांना दिलेले विशेष अधिकार बहुसंख्य हिंदूंना मात्र नाकारण्यात आले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७६ वर्षे उलटली तरीही हिंदूंच्या समस्यांची सूची एवढी मोठी आहे की, त्यामुळे ‘खरे स्वातंत्र्य मिळाले कि नाही ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘जो जिता वही सिकंदर’, असे शिकवले जाते; पण प्रत्यक्षात चंद्रगुप्त मौर्य विजयी झाला होता, हे शिकवले जात नाही. त्यासाठी आपली महान भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी हिंदूंनी प्रतिदिन धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ब्राह्मणपुरी येथील दत्त मंगल कार्यालयात आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात मार्गदर्शन करत होते. या मेळाव्यासाठी १५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

हिंदूसंघटन मेळाव्यात बोलतांना श्रीमती मधुरा तोफखाने (उजवीकडे), तसेच सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (डावीकडे), तसेच कु. प्रतिभा तावरे (मध्यभागी)

सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा परिचय श्रीमती मधुरा तोफखाने यांनी, तर समितीच्या कार्याचा परिचय कु. प्रतिभा तावरे यांनी करून दिला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. शरद देशपांडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. श्रीकृष्ण माळी, श्री. विनायक कुलकर्णी, दत्तभक्त सर्वश्री चंद्रशेखर कोडोलीकर आणि गजानन प्रभुणे, उद्योजक श्री. विकास कुलकर्णी, श्री. मंदार ताम्हणकर, बांधकाम अभियंता श्री. चेतन चोपडे, उद्योजक श्री. अरुण सन्मुख, श्री. दिगंबर कोरे, अधिवक्ता सी.जी. कुलकर्णी, अधिवक्ता शिरसाट यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात धर्मप्रेमी-जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले की,

१. आपले मन आणि आत्मा यांच्या रक्षणासाठी धर्मशिक्षण अन् त्यानुसार धर्माचरण अत्यावश्यक आहे. हिंदूंचे सण, व्रत, उत्सव आणि १६ संस्कार यांचे महत्त्व अन् शास्त्र जाणून त्यानुसार धर्माचरण आवश्यक आहे. रक्षाबंधन हा पवित्र सण असून त्याचा भावार्थ हा महाभारतातील श्रीकृष्ण-द्रौपदीच्या उदाहरणानुसार ‘भावाने बहिणीचे रक्षण करावे असे आहे’, या आध्यात्मिक परंपरेचा वारसा म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा करणे अपेक्षित आहे; परंतु आज अनेक हिंदू बंधू-भगिनींना हे ठाऊक नाही.

२. लोकशाहीमध्ये बहुसंख्य हिंदूंना श्रीकृष्णाच्या मथुरेतील मंदिरात, तसेच काशी विश्वेश्वराच्या महादेव मंदिरात पूजेचा अधिकार मिळवण्यासाठी अजूनही लढा द्यावा लागत आहे, हे दुर्दैवी आहे.