कंत्राटदाराने कंत्राट संपूनही घेतले वाहनचालकांकडून शुल्क !

  • ससून रुग्णालयाच्या वाहनतळामध्ये अपहार !

  • कंत्राटदारावर तातडीने कारवाई व्हायला हवी !

पुणे – ससून रुग्णालयात अवैध पद्धतीने वाहनतळ चालू असून वाहनतळाचे कंत्राट संपूनही कंत्राटदाराने मागील वर्षभरात वाहनचालकांकडून अवैध पद्धतीने शुल्काची वसुली केली आहे, तसेच कंत्राटदाराने ससून प्रशासनाला वाहनतळाचे दरमास दीड लाख रुपयांचे शुल्क दिले नसल्याचेही समोर आले आहे. ससून रुग्णालयातील वाहनतळ चालवण्याचे कंत्राट ‘एस्.के. इंटरप्राईजेस’ या आस्थापनाला नोव्हेंबर २०२० मध्ये २ वर्षांसाठी दिले होते. या कंत्राटाची मुदत नोव्हेंबर २०२२ मध्ये संपली आहे. माहिती अधिकारांतर्गत रुग्णालयातील वाहनतळाच्या संदर्भात माहिती मागवली असता त्याअन्वये रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या उत्तरात कंत्राटाचा कालावधी संपल्याचा उल्लेख असून करारावर ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची स्वाक्षरीही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे करार संपूनही मागील वर्षभराचे शुल्क न भरताच अवैध पद्धतीने कंत्राटदार वाहनतळ चालवत असून वाहनचालकांकडून पैसे वसूल करत आहेत. कंत्राटदाराने दिलेले काही धनादेशही वटलेले नाहीत. त्यामुळे कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची पावले उचलली जाणार असल्याची माहिती ससून रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक अनिल माने यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

कंत्राटाची मुदत संपून १ वर्ष उलटून गेल्यावरही शुल्काद्वारे लुबाडणार्‍या कंत्राटदाराकडून सर्व रक्कम वसूल करायला हवी !