|
नवी देहली – संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असतांना १३ डिसेंबर या दिवशी लोकसभेमध्ये प्रेक्षक गॅलरीमधून २ जणांनी सभागृहामध्ये उडी मारली. त्यांनी त्यांच्या बुटांमध्ये लपवलेली रंगीत धूर फेकणारी पावडर बाहेर फेकली. यामुळे सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर निर्माण झाला. या दोघांना खासदारांनी पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पकडून त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले आहे. या घटनेमुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. ‘या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन ती सभागृहात सादर केली जाईल’, असे आश्वासन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना दिली. या कृत्यामागील आरोपींचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. १३ डिसेंबर २००१ या दिवशी संसदेच्या बाहेर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. त्याच दिनांकाला अशा प्रकारची घटना घडणे, यामागे काय संदर्भ आहे ?, याचीही चौकशी केली जात आहे.
सौजन्य द इंडियन एक्सप्रेस
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी संसदेत प्रश्नोत्तराचा तास चालू होता. दोघांनी उड्या मारल्यानंतर ते सदस्यांच्या आसनांवरून उड्या मारत अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत होते. त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडून पावडरद्वारे धूर सोडला. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले.
संसदेबाहेरही दोघांनी सोडला धूर !
लोकसभेत घटना घडण्यापूर्वी संसदेच्या बाहेरही दोघा जणांकडून ‘कलर स्मोक ट्यूब’द्वारे पिवळ्या रंगाचा धूर सोडण्यात आला. त्यांनाही सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले आहे. लोकसभेत उड्या मारून धूर सोडणारे आणि बाहेर धूर सोडणारे चौघेही एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. ते सामाजिक माध्यमांद्वारे संपर्कात होते आणि त्यावरून त्यांनी या घटनेचा कट रचल्याचे प्राथमिक अन्वेषणातून समोर आले आहे. यात एका महिलेचा समावेश असून ती ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशी घोषणा देत होती.
कोण आहेत आरोपी ?
लोकसभेच्या सभागृहात उडी मारणार्यांची नावे सागर शर्मा आणि मनोरंजन अशी आहेत. या दोघांना कर्नाटकमधील भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांच्या पत्राद्वारे संसदेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसण्यासाठी पास दिला होता. यातील मनोरंजन हा कर्नाटकातील, तर सागर शर्मा लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) हा येथील रहाणारा आहे. या दोघांकडे भ्रमणभाष, बॅग किंवा स्वतःची ओळखपत्रे नव्हती.
संसदेच्या बाहेर धूर सोडणार्यांची नावे अमोल शिंदे आणि नीलम सिंह अशी आहेत. अमोल हा महाराष्ट्रातील लातूर येथील आहे, तर त्याच्यासमवेत असणारी नीलम सिंह नावाची महिला हरियाणाच्या हिस्सार येथील रहाणारी आहे. या चौघांसह आणखी दोन जण या कटात सहभागी आहेत. यातील ललित झा असे पाचव्या आरोपीचे नाव समजले असले, तरी सहाव्या आरोपीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या ६ जणांपैकी ५ जण देहलीबाहेरील आहेत. ते सर्व जण १२ डिसेंबरला गुरुग्राम (हरियाणा) येथील ललित झा याच्या घरी येऊन थांबले होते. त्यानंतर १३ डिसेंबरला ते देहलीत संसद भवनाजवळ पोचले. या सर्वांचा अशी कृती करण्यामागील उद्देश काय होता ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी घटनेच्या वेळी कोणतीही घोषणाबाजी केली नाही किंवा कोणतेही पत्रक फेकले नाही. पोलीस उर्वरित दोघांचा शोध घेत आहेत.
१५ दिवसांपूर्वी मिळाली होती आक्रमणाची माहिती ! – काँग्रेस
संसदेवर आक्रमण होण्याची गोपनीय माहिती १५ दिवसांपूर्वीच मिळाली होती, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.
‘कलर स्मोक ट्यूब’चा वापर कुठे केला जातो ?
दिवाळी किंवा विवाह यांच्या वेळी छायाचित्रे काढण्यासाठी ‘कलर स्मोक ट्यूब’चा वापर सर्रास केला जातो. या ट्यूबमध्ये रंग भरलेला असतो आणि ते उघडल्यावर रंगीत धूर बाहेर पाडतो. ट्यूबचा आकार लहान पाईपसारखा असतो आणि कमीतकमी २-३ घंटे धूर बाहेर पडू शकतो. यामुळे कोणतीही हानी होत नाही.
संपादकीय भूमिका
|