गोवा : बोरी येथील भूमीच्या मालकांना सुनावणीसाठी बोलावले;  मात्र स्वत: अधिकारी अनुपस्थित !

नवीन बोरी पुलासाठी भूसंपादनास भूमीमालकांचा विरोध कायम !

पणजी, १२ डिसेंबर (वार्ता.) : नवीन बोरी पूल उभारणीसाठी केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक मंत्रालयाने संमती दिलेली असली, तरी भूसंपादनास स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे भूमीमालकांची बाजू ऐकून घेण्यासाठी १२ डिसेंबर या दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते; परंतु सुनावणीला भूसंपादन अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने दुपारपर्यंत ही सुनावणी झाली नाही. यामुळे भूमीच्या मालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

नवीन बोरी पुलाची भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे; मात्र याला काही भूमीमालकांनी विरोध केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने १९ भूमीमालकांना १२ डिसेंबरच्या सुनावणीस उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भूमीचे मालक सकाळपासून ३५ कि.मी. प्रवास करून पणजी येथील मुख्य बांधकाम खात्याच्या कार्यालयात पोचले; परंतु तेथे सुनावणीसाठी भूसंपादन अधिकारी आले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

 (सौजन्य : In Goa 24×7)

संपादकीय भूमिका

ही आहे प्रशासकीय अधिकार्‍यांची जनतेप्रतीची संवेदनशीलता ! प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अशा वागण्याने जनतेत त्यांच्याविषयी कधी विश्‍वास निर्माण होईल का ? आणि त्यांचा पुलाला होणारा विरोध कधी मावळेल का ?