हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथे शौर्य प्रशिक्षण शिबिर
रत्नागिरी, ४ डिसेंबर (वार्ता.) – पूर्वीच्या काळी आपल्या देशात स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना महिलांची असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी महिलांनी धर्माचरण करून आत्मबल वाढवण्यासमवेतच स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षितही झाले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश कोंडस्कर यांनी केले.
तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशीतील मुलींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात ९८ शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता. शिबिराचा उद्देश कु. सुवर्णा सकपाळ यांनी सांगितला. सूत्रसंचालन कु. मिथिला वाडेकर यांनी केले.
श्री. प्रकाश कोंडस्कर पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा असुरांचा प्रकोप वाढला, तेव्हा श्री दुर्गादेवीने सर्व असुरांचा नाश करून विजयादशमी साजरी केली. स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून शौर्य गाजवले, त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. काळाची पावले ओळखून महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही सक्षम होणे आवश्यक आहे. आपल्या ऋषिमुनींनी कठोर तपश्चर्या करून अखिल मानव जातीसाठी उपलब्ध केलेल्या ज्ञानाचा आपण जीवनात लाभ करून घेतला पाहिजे आणि भारतीय संस्कृतीनुसार आचरण केले पाहिजे.’’
या वेळी कु. सुवर्णा सकपाळ म्हणाल्या की, आपल्याकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून न बघता नम्रतेने बघणारा समाज निर्माण करायचा असेल, तर आपल्या आचरणात पालट करायला हवा.
कु. मिथिला वाडेकर यांनी सांगितले की, आपल्याला आरामदायी जीवन जगण्याचे स्वातंत्र्य क्रांतीकारकांनी मिळवून दिले आहे; म्हणूनच आपण मातृभूमीसाठी वेळ देण्याचा निर्धार करूया !
शिबिरार्थींचे मनोगत :
१. माजी सरपंच सौ. माधवी संतोष गोताड : चांगला उपक्रम असून प्रशिक्षण शिकावे, ही इच्छा निर्माण झाली.
२. सौ. संस्कृती धामणे : प्रशिक्षण पुष्कळ चांगल्या प्रकारे दिले.
३. कु. श्वेता जोशी : प्रत्येक युवती ही रणरागिणी झाली पाहिजे. आई-वडिलांना न सांगता कुठेच जाऊ नका, प्रशिक्षण घेऊन शौर्यवान व्हा ! नेहमी समोरच्याची नजर कशी आहे? हे ओळखायला शिका.
४. कु. गौरी गोगटे : अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
५. कु. स्नेहा शेंडे : सर्वांनी स्वसंरक्षण शिकावे. प्रत्येक वाडीत असे वर्ग चालू करावेत.