न्यूझीलंडमध्ये खलिस्तानविरोधी भारतीय वंशाच्या रेडिओ निवेदकावर प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण
ऑकलँड (न्यूझीलंड) – रेडिओवर निवेदक असणारे भारतीय वंशाचे नागरिक हरनेक सिंह नेकी यांची हत्या करण्यासाठी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने ३ खलिस्तानी आतंकवाद्यांना दोषी ठरवले आहे. त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. हरनेक सिंह नेकी खलिस्तानी विचारसरणीचे कट्टरविरोधक असल्याने त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. हरनेक यांच्यावर २३ डिसेंबर २०२० मध्ये आक्रमण करण्यात आले होते.
१. या कटात २७ वर्षीय सर्वजीत सिद्धू मुख्य सूत्रधार आहे. त्याने आरोप स्वीकारला आहे. त्याचा दुसरा साथीदार ४४ वर्षीय सुखप्रीत सिंह आहे, तर तिसर्याचे नाव उघड करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
२. हरनेक सिंह नेकी यांच्यावर खलिस्तान्यांनी पाठलाग करून आक्रमण केले होते. यात हरनेक यांना चाकूने ४० वेळा भोसकण्यात आले. यात गंभीररित्या घायाळ झालेल्या नेकी यांच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांचा जीव वाचला होता. या वेळी त्यांच्या शरिरावर ३५० टाके घालण्यात आले होते.