श्रीकृष्णाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढवणारा विद्वत्तापूर्ण ग्रंथ : ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ ! – – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘श्री. दुर्गेश परुळकर यांनी लिहिलेला ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ वाचला. श्री. परुळकर यांच्या धर्माविषयीच्या व्यासंगातून साकारलेला हा ग्रंथ एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेवावासाच वाटत नाही, इतका तो मंत्रमुग्ध करणारा आहे ! भगवान श्रीकृष्णाविषयी इतकी सविस्तर माहिती या ग्रंथामुळे प्रथमच वाचायला मिळाली. श्रीकृष्णाच्या संदर्भातील अनेक कथाही समजल्या. श्रीकृष्णासंबंधीच्या कथा अन्य ग्रंथांतही दिलेल्या असतात; पण ‘कथांतून नेमका कोणता बोध घ्यायचा ?’, हे या ग्रंथातून सहजपणे उलगडते. हा ग्रंथ विद्वत्तापूर्ण असूनही सुगम आहे, हेही या ग्रंथाचे एक वैशिष्ट्यच आहे. श्री. परुळकर यांच्या श्रीकृष्णभक्तीचा सुगंध ग्रंथ वाचतांना दरवळत रहातो. त्यामुळे ग्रंथ वाचतांना अनेक वेळा माझी भावजागृतीही झाली. श्री. परुळकर यांनी श्रीकृष्णावरील आक्षेपांचेही अतिशय अभ्यासपूर्ण खंडन केले आहे. ‘श्रीकृष्णभक्तांनी केवळ उपास्यदेवतेची भक्ती करायची, एवढेच पुरेसे नसून त्यांना आपल्या धर्मश्रद्धांचे भंजन करणार्‍यांचा बाणेदारपणे प्रतिवादही करता यावा, एवढा जाज्ज्वल्य धर्माभिमान त्यांच्यात असायला हवा’, हा संदेशच जणू त्यांनी दिला आहे ! यामुळेच या श्रीकृष्णचरित्राला पूर्णत्वही आले आहे. ‘या ग्रंथाच्या वाचनाने साधक आणि भक्त यांची भगवान श्रीकृष्णावरील श्रद्धा आणि भक्ती दृढ होईल’, याची मला निश्‍चिती आहे.

‘हा ग्रंथ अवश्य वाचावा’, असा आहे. ‘ग्रंथ वाचून झाल्यावर वाचकांनी त्यांचा अभिप्राय प्रकाशकाच्या पत्त्यावर टपालाने किंवा ‘ई-मेल’ने कळवावा’, ही विनंती.

‘श्री. परुळकर यांच्या हातून अशीच धर्मजागृती आणि धर्मरक्षण करणारी सेवा निरंतर घडो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.१०.२०२३)

दुर्गेश परूळकर लिखित ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ ग्रंथाचे प्रकाशन ! 

श्री. दुर्गेश परुळकर लिखित ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना पुरातत्त्व खात्याचे उपसंचालक श्री. विलास वहाणे, श्री. प्रमोद कांबळे, श्री. दुर्गेश परुळकर आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

ओझर – पुणे जिल्ह्यातील ओझर येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्रीकृष्ण यांचे जीवन आणि शिकवण यांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडणारे ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर लिखित ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते झाले. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे चित्र श्री. परूळकर यांना भेट दिले. श्री. दुर्गेश परूळकर यांनी हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करत असल्याचे म्हटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या ग्रंथाविषयी दिलेल्या संदेशाचे या वेळी वाचन करण्यात आले.

व्यवहारात गांगरून गेलेल्यांसाठी भगवद्गीता मार्गदर्शक ! – दुर्गेश परूळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

श्री. दुर्गेश परुळकर

श्रीकृष्ण हे आपल्या मनात कायम स्थान मिळवलेले ‘भगवान’ म्हणून ओळखले जातात. श्रीकृष्णाने संपूर्ण जीवन सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक पालट यांसाठी खर्ची घातले, मग ते केवळ भगवान होते का ? स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीने श्रीराम आणि श्रीकृष्ण हे राष्ट्रपुरुष आहेत. रामायण, महाभारत हे आपले ऐतिहासिक ग्रंथ आहेत. कोणत्याही संकटापुढे पराजय मानायचा नाही. आपण सतत प्रयत्नवादी असले पाहिजे, हे भगवान श्रीकृष्णाकडून आपणाला शिकायला मिळते. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की, श्रीकृष्णाला समजून घेण्यासाठी न्याय, नीती आणि सत्य या दृष्टीने योग्य अन् उपयुक्त गोष्ट केली पाहिजे. यासाठी सूक्ष्मातून विचार केला पाहिजे. समोरची व्यक्ती जशी असेल, तसे आपण वागले पाहिजे. यालाच समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘ठकासी असावे ठक । उद्धटासी उद्धट । खटनटासी खटनट ।’ आपल्या जीवनाचे व्यावहारिक आणि पारमार्थिक असे दोन पैलू आहेत. व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवन जगतांना दोन्हींचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे, हे श्रीकृष्णाने आपल्या जगण्यातून शिकवले.

श्रीकृष्णाने तत्त्वज्ञान सांगून अर्जुनाला युद्धासाठी सिद्ध केले; पण हे करतांना त्यांची कुठेही आग्रही भूमिका नव्हती. अर्जुनाला वैचारिक, भावनिक आणि बौद्धिक पातळीवर सर्व पटवून दिले आणि मगच अर्जुनाने त्यानुसार आचरण केले. जीवनात आपण गांगरून जातो, त्या वेळी भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शक ठरते.