‘स्त्रीवाद’ ही फालतू गोष्ट ! – नीना गुप्ता, अभिनेत्री

अभिनेत्री कंगना रणावत यांचेही या वक्तव्याला समर्थन

नीना गुप्ता, अभिनेत्री

मुंबई – ‘फेमिनिझम्’ (स्त्रीवाद) ही फालतू गोष्ट आहे. जेव्हा पुरुष गरोदर होतील, तेव्हाच खरी स्त्री-पुरुष समानता (जे अशक्य आहे) येईल. ‘महिला या पुरुषांच्या समान आहेत’ या सूत्राकडेही दुर्लक्ष करायला हवे. आर्थिकदृष्ट्या सक्षम रहाण्यापेक्षा जर तुम्ही गृहिणी असाल, तर त्या कामाला कमी लेखू नका. तेही पुष्कळ महत्त्वाचे काम आहे. ‘तुम्ही स्वतःला कमी लेखणे थांबवा’, हाच संदेश मला द्यायचा आहे, असे अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीच्या वेळी वक्तव्य केले होते. त्याला विरोध व्हायला लागल्यावर अभिनेत्री कंगना रणौत यांनीही या विधानाचे समर्थन केले आहे.

आपल्यापैकी कुणीही समान नाही ! – कंगना राणावत, अभिनेत्री

स्त्री आणि पुरुष कधीही समान होऊच शकत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत एकमेकांपासून वेगळे आहेत. स्त्री-पुरुष सोडा; पण आपल्यापैकी कुणीही समान नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण विकासाच्या वेगळ्या पातळीवर आहे. आपल्याकडे देव, गुरु, वरिष्ठ, पालक किंवा अगदी ‘बॉस’ही आहेत. काहींना अधिक अनुभव आहे किंवा काही प्रत्यक्षात अधिक विकसित झाले आहेत; पण आपण कोणत्याही पातळीवर समान नाही.  स्त्री-पुरुषांना एकमेकांची आवश्यकता असते. ते एकमेकांविना त्यांचे जीवन जगू शकत नाहीत. ‘यात कसली लाज वाटते ?’, हेच मला समजत नाही. पुरुषांना ७ दिवस रक्तस्राव होत नाही. मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत. सध्याच्या फालतू ‘फेमिनिझम्’कडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे, अशी पोस्ट कंगना राणावत यांनी ‘इन्स्टाग्राम’वर केले आहे.

संपादकीय भूमिका

  • स्त्री आणि पुरुष हे समान होऊ शकत नाहीत; कारण दोघांची बलस्थाने भिन्न आहेत. ते एकमेकांना पुरक होऊ शकतात आणि हेच मानवी सृष्टीचलनाचे गमक आहे. साम्यवाद्यांच्या चुकीच्या वैचारिक भूमिकांमुळे पाश्‍चात्य देशांतून आलेल्या या ‘समानते’च्या संकल्पनेने भारतातही वैचारिक दिशाभूल करून भारतीय समाजाची एकप्रकारे अधोगतीच केली आहे !