मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. वर्ष २०२०-२१ पासून राज्यात ही योजना राबवण्यास प्रारंभ करण्यात आला. सद्यःस्थितीत राज्यातील ४७८ शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने ही योजना आणली होती. यापुढे मात्र या योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे, विद्यार्थी आणि शाळा यांची स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरण संवर्धन आदी सूत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे शाळा आणि शिक्षण यांचा दर्जा वाढण्यास साहाय्य होणार आहे.