(‘बाऊंसर’ म्हणजे खासगी सुरक्षारक्षक)
म्हापसा, ३० नोव्हेंबर (वार्ता.) : गोव्यात हॉटेल व्यावसायिक, दलाल आणि ‘बाऊंसर’ यांच्याकडून पर्यटकांना लुटण्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. यामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्राची प्रतिमा मलीन होत आहे. कळंगुट येथील ‘डेव्हील्स प्लेस’ या ‘नाईट क्लब’मध्ये पर्यटकांना लुटण्याचा नुकताच एक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ‘क्लब’चे मालक आणि ‘बाऊंसर’ यांच्या विरोधात पोलिसांनी कर्नाटक येथील पर्यटकांकडून ७९ सहस्र रुपये लुटल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी मूळचा झांशी, उत्तरप्रदेश येथील ‘बाऊंसर’ ‘रेंबो’ उपाख्य रेमंड हाऊसी याला कह्यात घेतले आहे, तर अन्य ३ जण पसार आहेत. या प्रकरणी पर्यटक प्रवीण कुमार हा तक्रारदार आहे.
On the complaint of the tourist FIR registered and investigation taken up. pic.twitter.com/DON6xF3vRV
— SP North | Goa Police (@spnorthgoa) November 29, 2023
तक्रारीनुसार ‘नाईट क्लब’मधील ‘बाऊंसर’नी पर्यटकांच्या भ्रमभाषची तोडफोड केली आणि त्यांची आणखी हानी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पर्यटकांची सुमारे १ लाख २१ सहस्र रुपयांची हानी झाली. कळंगुट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश नाईक म्हणाले, ‘‘बागा समुद्रकिनारपट्टीत ‘नाईट क्लब’मधील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुलींना ठेवले जात आहे. यानंतर पर्यटकांना दारू प्यायला देतात आणि त्यांची नशा चढल्यानंतर ‘बाऊंसर’च्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. असे प्रकार दक्षिण-पूर्व आशिया खंडात होत असतात आणि असे प्रकार गोव्यात खपवून घेतले जाणार नाहीत.’’
संपादकीय भूमिकापर्यटकांना लुटणारे राज्याचे शत्रूच ! |