अमृतमय संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये
सुरससुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया।
अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा न च कठिना॥
अर्थ : रसभरित, संपूर्ण विश्वाला आनंंद देणारी, ललित, हृद्य, रमणीय, अमृतमय अशी संस्कृत भाषा क्लिष्टही नाही अन् कठीणही नाही.
संकटकाळी बुद्धीसुद्धा मलीन होणे
असम्भवं हेममृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्रायः समापन्नविपत्तिकाले धियोऽपि पुंसां मलिनीभवन्ति॥
अर्थ : सोन्याच्या हरिणाचा जन्म अशक्य; पण रामाला त्याचा लोभ वाटला. संकटकाळी बहुधा बुद्धीमंतांची बुद्धीसुद्धा मलीन होते.
कुत्र्याच्या जिण्यापेक्षाही दास्यत्व हीन !
सेवा श्ववृत्तिराख्याता तैर्न सम्यगुदाहृतम्।
स्वच्छन्दचारी कुत्र श्वा विक्रीतासुः क्व सेवकः॥
अर्थ : ‘नोकरी, म्हणजे कुत्र्याचे जिणे’, असे ज्यांनी म्हटले, ते योग्य नव्हे. मन मानेल, तसे फिरणारा कुत्रा कुठे आणि प्राणही परतंत्र (गुलाम) केलेला नोकर कुठे !
धैर्य
कदर्थितस्यापि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम्।
अधोमुखस्यापि कृतस्य वह्नेर्नाधः शिखा यान्ति कदाचिदेव॥
अर्थ : धैर्यशील माणसाला अपमानित केले, तरी त्याचा ‘धैर्य’ हा गुण जात नाही. मशालीचे (अग्नी) मुख खाली केले, तरी अग्नीच्या ज्वाळा खाली जात नाहीत.