शरद पवार समर्थकांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला काळे फासले !

नामदेव जाधव आणि शरद पवार

पुणे – राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला येथे काळे फासलेे. माध्‍यमांशी बोलत असतांनाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला काळे फासले. या वेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्‍थळावरून त्‍यांना बाजूला नेले. पवार समर्थक नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला काळे फासत असतांना त्‍यांनी पवारांच्‍या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्‍या. जाधवांना काळे फासण्‍यात पवार गटाच्‍या महिला कार्यकर्त्‍यांचाही समावेश होता. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्‍या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्‍यानंतर ही घटना घडली आहे.

पवार गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी भांडारकर प्राच्‍यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणार्‍या नामदेव जाधव यांच्‍या कार्यक्रमाला विरोध केला होता. तसेच त्‍यांनी जाधव यांच्‍या तोंडाला काळे फासण्‍याची चेतावणी दिली होती. यानंतर भांडारकर संस्‍थेने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये; म्‍हणून नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रहित केला. त्‍याच वेळी नवी पेठेत राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी नामदेव जाधव यांच्‍या चेहर्‍याला काळे फासले.

या आंदोलनापूर्वी जाधव आणि शरद पवार गटात आरोप-प्रत्‍यारोप झाले होते. ‘त्‍यात विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. मी कागद दाखवतो, हे दंडुके दाखवतात. हा पुरोगामी विचारांचा महाराष्‍ट्र आहे, असे तुमचे नेते सांगतात, जर तुमच्‍या हातून असे कृत्‍य घडले, तर तुमच्‍या नेत्‍यांच्‍या प्रतिमेला धक्‍का बसेल. जिजाऊंच्‍या वंशजाच्‍या तोंडाला काळे फासले म्‍हणून तुम्‍हाला कदाचित् यशवंतराव चव्‍हाणांच्‍या समाधीसमोर बसून आत्‍मक्‍लेष उपोषणाला बसावे लागेल’, अशी चेतावणी नामदेव जाधवांनी दिली होती.

शरद पवार यांनी त्‍यांची जात घोषित करावी ! – प्रतापराव जाधव, खासदार, शिवसेना

बुलढाणा – नामदेवराव जाधव यांना काळे फासण्‍याच्‍या घटनेचा आम्‍ही निषेध करतो. नामदेव जाधव यांनी एका संकेतस्‍थळावर शरद पवार ‘ओबीसी’ असल्‍याचे प्रमाणपत्र मिळवले होते. त्‍या संकेतस्‍थळावर कारवाई करण्‍याचे सोडून शरद पवार गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी नामदेव जाधव यांना काळे फासले. तरी शरद पवार यांनी ते मराठा कि ओबीसी ? हे घोषित करावे, असे जाहीर आव्‍हान शिवसेनेचे बुलढाणा येथील खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले आहे.