Boycott Sunburn Festival : गोवा सरकारची मान्यता मिळण्यापूर्वीच सनबर्नकडून कलाकारांच्या नावांची घोषणा

पणजी, १७ नोव्हेंबर (वार्ता.) : गोवा सरकारने ‘सनबर्न २०२३’च्या आयोजनाला मान्यता देण्याविषयी अजूनही वाच्यता केलेली नसली, तरी ‘सनबर्न’च्या आयोजकांनी ‘सनबर्न २०२३’ वागातोर येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचे घोषित केले आहे, तसेच ‘सनबर्न २०२३’मध्ये सहभागी होणार्‍या कलाकारांच्या नावांचीही घोषणा केली आहे.

सनबर्न कार्यक्रमाच्या गतवर्षीच्या आयोजनावरून कोमुनिदाद शुल्काविषयीचा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांनाही सर्वाेच्च न्यायालयाने ‘सनबर्न-२०२३’चे आयोजन करण्यासंबंधीच्या अर्जावर सरकारने विचार करता येईल’, असे स्पष्ट केले आहे. ‘सनबर्न २०२३’ला मान्यता दिल्यास आयोजकांना कोमुनिदाद प्रशासन मागणार असलेले शुल्क भरावे लागणार असल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार ‘सनबर्न २०२३’मध्ये यंदा १२० कलाकार सहभागी होणार आहेत आणि यासाठी ६ मंच निर्माण केले जाणार आहेत. गेली १७ वर्षे सनबर्न कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

संपादकीय भूमिका

‘गोवा सरकार महसुलासाठी सनबर्नला मान्यता देणारच’, याची सनबर्नच्या आयोजकांना निश्चिती आहे, असेच जनतेला वाटणार !