मुंबई – महाराष्ट्रातील जवळजवळ ४० लाख गायी आणि म्हशी यांना वंध्यत्वाची समस्या आहे. त्यामुळे या गायी-म्हशी माजावर येत नाहीत (मीलनास सिद्ध होत नाहीत). त्यामुळे त्यांच्यापासून नवीन वंशाची निर्मिती होत नाही. राज्यातील पशूधनाची ही समस्या लक्षात घेऊन राज्यशासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ‘राज्यव्यापी वंध्यत्व निवारण’ अभियान घेण्यात येणार आहे.
देशात दूध उत्पादनात महाराष्ट्राचा ६ वा क्रमांक आहे. वर्ष २०१९ च्या पशूगणनेनुसार राज्यात एकूण १ कोटी ९५ लाख ९५ सहस्र ९९६ गायी आणि म्हशी आहेत. यांतील केवळ ५६ लाख २२ सहस्र ५२७ गायी आणि ३२ लाख ८१ सहस्र ६५७ म्हशी प्रजननक्षम आहेत. यांतील केवळ १८ टक्के गायी आणि म्हशी यांना कृत्रिम रेतन केले जाते. राज्यातील प्रजननक्षम गायी-म्हशी यांपासून मिळणार्या दुधावरूनच देशात महाराष्ट्राचा ६ वा क्रमांक आहे. राज्याची दूध उत्पादकता वाढवण्यासाठीच राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान घेण्यात येणार आहे.