Goa Proposal For Third District : राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव !

सरकारकडून ७ सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना

पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) : राज्यात तिसरा जिल्हा स्थापन करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा कृषीमंत्री रवि नाईक यांनी यापूर्वी अनेक वेळा राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याची मागणी केली आहे. राज्यात तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीच्या अनुषंगाने सरकारने ७ सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली आहे. अभ्यास समिती ३ मासांच्या समयमर्यादेत तिचा अहवाल सरकारला सुपुर्द करणार आहे. राज्यात सध्या उत्तर आणि दक्षिण, असे दोन जिल्हे आहेत.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

सरकारने स्थापन केलेल्या समितीला राज्यासाठी खरोखरच तिसर्‍या जिल्हाची आवश्यकता आहे का ? तिसरा जिल्हा स्थापन झाल्यास सर्वसाधारण नागरिकांचे कल्याण होणार आहे का ? तसेच विशेषत: मागासलेल्या तालुक्यांचा विकास होणार आहे का ? तिसरा जिल्हा स्थापन करण्याचे निश्तिच झाल्यास लोकसंख्या, आर्थिक स्थिती, साधनसुविधांची उपलब्धता आणि जनतेची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून तिसर्‍या जिल्ह्याची सीमा निश्चित करणे, तिसरा जिल्हा स्थापन करण्यासाठी येणारा खर्च आणि त्याचा होणारा लाभ आदींविषयी माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे मुख्य सचिव असतील, तर प्रधान सचिव (अर्थ), रहिवासी आयुक्त, सचिव (महसूल), जिल्हाधिकारी (दक्षिण/उत्तर) आणि चारुदत्त पाणीग्रही (मुख्यमंत्र्यांचे सल्लागार) हे समितीचे सदस्य असणार आहेत.