हमासचे समर्थन करणार्‍यांवर राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी ! – हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

आंदोलनात संबोधित करतांना श्री. हेमंत सोनावणे

सातारा, १६ नोव्‍हेंबर (वार्ता.) – पॅलेस्‍टाईन येथील हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर आक्रमण करून १ सहस्र ४०० हून अधिक नागरिकांची हत्‍या केली. शेकडो महिलांवर बलात्‍कार करण्‍यासह लहान मुलांचा शिरच्‍छेद केला. अशा हमासला आतंकवादी संघटना म्‍हणून घोषित करावे, तसेच हमासला पोसणार्‍या पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ देशात मोर्चे काढणारे आणि आंदोलने करणारे यांच्‍यावर राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्याच्‍या अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्‍यात आली. सातारा येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्‍यात आले. या वेळी हिंदु महासभा महाराष्‍ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्‍ता दत्तात्रय सणस, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्‍हा मंत्री रवींद्र ताथवडेकर, बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक विक्रांत विभुते, अधिवक्‍ता धनंजय चव्‍हाण आणि अन्‍य धर्मप्रेेमी उपस्‍थित होते. या वेळी सातारा जिल्‍हा प्रशासनाला निवेदन देण्‍यात आले.

निवेदनामध्‍ये म्‍हटले आहे की, पॅलेस्‍टाईनमधील हमास ही जागतिक स्‍तरावरील क्रूर आतंकवादी संघटना आहे. अनेक पाश्‍चिमात्‍य देश आणि इस्‍लामी राष्‍ट्रे हमासला आतंकवादी संघटना मानतात. भारताने हमासला आतंकवादी संघटना म्‍हणून घोषित करण्‍याची वेळ आली आहे. भविष्‍यात भारतामध्‍ये आतंकवादी संघटनांनी आक्रमण केले, तर आज हमासला पाठिंबा देणारे उद्या आतंकवादी संघटनांना पाठिंबा देण्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरतील. काश्‍मीरमध्‍ये अशा प्रकारे सैनिकांवर आक्रमणे झाल्‍याचे सर्वांनी पाहिले आहे. हमासला पाठिंबा देणारे देशातील अंतर्गत संघर्षाला कारणीभूत ठरतील. यामुळे देशात गृहयुद्ध होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. या आतंकवाद्यांच्‍या समर्थकांना वेळीच पायबंद घालायला हवा. यामुळे केंद्रशासनाने याची वेळीच नोंद घेऊन संबंधितांविरुद्ध राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी.