पणजी : ‘इंडिया ट्रेड प्रमोशन संस्थे’च्या वतीने आयोजित केलेल्या ४२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याचे दालन (पॅव्हेलियन) उभारण्यात आले आहे. राजधानी नवी देहलीतील प्रतिष्ठित प्रगती मैदानातील जागेत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यंदाचा मेळावा हा ‘वसुधैव कुटुम्बकम् – व्यापाराद्वारे एकत्र’ या संकल्पनेवर आधारित आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सदाशिव नारायण पंडित, अधिकारी विशांत नाईक, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे माहिती अधिकारी ऑलविन परेरा, साहाय्यक माहिती अधिकारी सिद्धेश सामंत, पर्यटन खात्याचे माहिती अधिकारी राजेंद्र तारी, गोवा पर्यटन विकास महमंडळाचे व्यवस्थापक शंकर नाईक या वेळी उपस्थित होते. या वेळी श्री. बांदेकर यांच्या हस्ते ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
विविध पैलूंवरील माहिती प्रभावीपणे विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यासाठी राज्य सरकारची नोडल एजन्सी असलेला माहिती आणि प्रसिद्धी विभाग हा या वार्षिक व्यापार मेळ्यामध्ये गोव्याच्या सहभागासाठी नोडल विभाग आहे. ज्यामध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, तसेच जगभरातील देशांनी त्यांची प्रगती आणि विकास दाखवून आंतरराष्ट्रीय मेळ्यात भाग घेतला आहे. पर्यटन विभाग, गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी), उद्योग, व्यापार आणि वाणिज्य विभाग, गोवा औद्योगिक विकास महामंडळ, हस्तकला विभाग, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभाग आणि गोवा गुंतवणूक प्रोत्साहन सुविधा मंडळ यांनीही या मेळ्यात सहभाग घेतला आहे.