तरुणाची ४ लाख ५६ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक : तिघांविरोधात गुन्हा नोंद

‘इंडिड जॉब सर्च ॲप’ (प्रतिकात्मक चित्र)

रत्नागिरी – नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाला एका आस्थापनाचे अधिकारी असल्याचे सांगून ४ लाख ५६ सहस्र २२५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १३ नोव्हेंबर या दिवशी तालुक्यातील पूर्णगड पोलीस ठाण्यात अमित मिश्रा, महेंद्र तिवारी आणि आस्थापनाची एक व्यक्ती असे तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी रनपार येथील अभिषेक वीरेंद्र सुर्वे  याने तक्रार प्रविष्ट केली आहे.

या तक्रारीनुसार ४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अभिषेक सुर्वे याने नोकरीच्या शोधासाठी ‘इंडिड जॉब सर्च ॲप’ डाऊनलोड केले होते. हा ॲप पाहिला असता त्याला रायगड जिल्ह्यातील डोलवी-पेण येथील जे.एस्.डब्ल्यू. या आस्थापनेत नोकर भरतीचे विज्ञापन दिसले. त्याने ऑनलाईन अर्ज भरून आस्थापनाला पाठवला. त्यानंतर अमित मिश्रा याने संपर्क करून आस्थापनाचे देखभाल विभाग स्वत:कडे असल्याचे सांगितले. त्यामुळे नोकरी पाहिजे असल्यास दोन पगार एच्. आर्. ला द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर अभिषेकने दिलेल्या बँक खात्यात ४ लाख ५६ सहस्र २२५ रुपये पाठवले होते. त्यानंतर अभिषकने त्याच्या मित्रामार्फत आस्थापनाशी संपर्क साधून भ्रमणभाषवर आलेल्या आस्थापनाच्या जाहिरातीची निश्चिती केली. त्या वेळी हे सर्व आस्थापन प्रकरण बनावट असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिषक सुर्वे याने पोलिसांत तक्रार केली.