दैनिक ‘सनातन प्रभात’ने बसस्थानकांची दुरवस्था केली होती उघड !
मुंबई, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ अभियानाच्या अंतर्गत राज्यातील बसस्थानके स्वच्छ करण्यात येत आहेत. ‘एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका’ प्रसिद्ध करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसस्थानकांच्या स्वच्छतेविषयी बैठक घेऊन ३ महिने झाले, तरीही बसस्थानकांच्या स्वच्छतेकडे परिवहन विभागाकडून दुर्लक्षच करण्यात येत होते. याच कालावधीत दैनिक ‘सनातन प्रभात’ने राज्यातील विविध जिल्ह्यांतील १८ बसस्थानकांची दुरवस्था छायाचित्रांसह प्रसिद्ध केली.
दैनिक ‘सनातन प्रभात’मधून बसस्थानकांमधील प्रसाधनगृहांची अस्वच्छता, बसस्थानकांच्या रस्त्यांवरील खड्डे, पिण्याच्या पाण्याचे तुटलेले अथवा गळणारे नळ, बसस्थानकांवरील तुटलेली आसने, तंबाखूच्या पिचकार्यांनी बसस्थानकांच्या खराब झालेल्या भिंती, परिसरात साठलेला कचरा, उपाहारगृहांची दुरवस्था, जळमटांनी भरलेली छते, प्रसाधनगृहातून बसस्थानकाच्या परिसरात सोडण्यात येणारे मलमूत्र यांसह बसगाड्यांची दुरवस्था ही सर्व दु:स्थिती छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आली होती. बसस्थानकांच्या स्वच्छतेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: बैठक घेऊनही त्याची प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याचा प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आला होता.
प्रत्येक बसगाडी केली जात आहे स्वच्छ !
प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या प्रत्येक बसगाडीची स्वच्छता चालू करण्यात आली आहे. अनेक बसस्थानकांवर बसगाड्या पाण्याने आतून आणि बाहेरून स्वच्छ करण्यात येत आहेत. बसगाड्यांचे नामफलकही चांगले करण्यात आले आहेत.
दिवाळीनिमित्त बसस्थानकांवर फुलांची तोरणे आणि रंगरंगोटी !
दिवाळीनिमित्त बसस्थानकांवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. अनेक बसस्थानकांवर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. अनेक बसस्थानकांवर फुलांची तोरणे लावण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी सुशोभिकरणासाठी फुलदाण्या ठेवण्यात आल्या आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’ने राबवली मोहीम !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी रत्नागिरी, राजापूर, दापोली, देवगड, अमरावती, यवतमाळ, वणी (जि. यवतमाळ), आर्णी ( जि. यवतमाळ), जळगाव, भुसावळ (जि. जळगाव), अकोला, सातारा, सोलापूर आदी १८ बसस्थानकांवर जाऊन बसस्थानकांच्या दुरवस्थेची माहिती घेतली. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून १८ भागांत वृत्ते प्रसिद्ध करून राज्यातील बसस्थानकांची दु:स्थिती उघड केली होती.
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्तांनंतर नंतर कामांना वेग !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळाने १८ एप्रिल २०२३ या दिवशी एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सर्व वृत्ते, तसेच अस्वच्छ बसस्थानकांची छायाचित्रे त्यांना सादर केली. यासह परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ही छायाचित्रे आणि वृत्ते सादर करण्यात आली होती. यानंतर राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेला वेग आला.