Diwali 2023 Worldwide : देश-विदेशात निरनिराळ्‍या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी !

घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशातही चैतन्‍याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या घरापर्यंत पोचली आहे, तर इंग्‍लंडच्‍या रस्‍त्‍यांवरही तिची धूम दिसते. सगळे जगच एक ग्‍लोबल व्‍हिलेज झालेले असल्‍याने प्रत्‍येक देशातच विविध देशांतील लोक कामधंदा आणि शिक्षण या निमित्ताने जातात. कालांतराने स्‍थायिकही होतात. भारतीय लोक त्‍याला अपवाद नाहीत. लोकांसमवेत त्‍यांची संस्‍कृती, भाषा आणि सण हे सगळे आलेच. त्‍यामुळे आता जगभर पसरलेल्‍या भारतियांनी दिवाळी अथवा दीपावली हा सणही जगभर नेला आहे. त्‍यात विविध वेशभूषा, भारतीय मिष्‍टान्‍ने, फराळाचे पदार्थ, सांस्‍कृतिक कार्यक्रम, रांगोळी, मेंदी, दिव्‍यांची, इतर आरास आणि शोभेचे दारूकाम असतेच. भारताशेजारच्‍या, तसेच पुढारलेल्‍या काही देशांतून दिवाळी साजरी करतांना भारतापेक्षा वेगळ्‍या काय गोष्‍टी असतात, ते पाहूया.

– कल्‍याणी गाडगीळ (दैनिक लोकमत (मंथन), ऑक्‍टोबर २०१६)

दिवाळीची जागतिकता !

विदेशात दिवाळी साजरी करतांनाची ही छायाचित्रे म्‍हणजे भारतियांसाठी आनंदाची पर्वणीच आहे. दिवाळीप्रतीचा सर्वांचाच उत्‍साह पाहून सर्वत्र चैतन्‍याचे जणू कोंदणच निर्माण होत असल्‍याचे लक्षात येते ! जागतिक होत चाललेल्‍या दिवाळीचा मनमुराद आनंद लुटूया !

आनंदमयी दीपावली !

‘दीपोत्‍सव’, ‘नयनरम्‍य’, ‘नयनमनोहारी’, ‘विलोभनीय’, ‘अविस्‍मरणीय’, ‘प्रसन्‍नदायी’ हे शब्‍द उच्‍चारले, तरी सर्वत्र आनंदलहरी पसरतात. या शब्‍दांची प्रचीती देणारी  दीपावली म्‍हणूनच सर्वांवर आनंदाची उधळण करणारी ठरते.

१.  नेपाळ

कावळे आणि कुत्रे यांच्‍या माध्‍यमातून दिवाळी सण साजरा करणारे अनोखे राष्‍ट्र नेपाळ !

नेपाळमध्‍ये दिवाळी सण तिहार म्‍हणून साजरा केला जातो. पहिला दिवस काग तिहार म्‍हणजे कावळ्‍यांचा दिवस ! त्‍यांच्‍यासाठी गोडधोड पदार्थ घराच्‍या छपरावर ठेवतात. त्‍यांचे ओरडणे हे दु:ख आणि मृत्‍यूचे प्रतीक असल्‍याने सणापूर्वी ते दूर करण्‍यासाठी हा नैवेद्य ! (पितृपक्षात कावळ्‍याला पिंडदान केले जाते, त्‍याच आधारावर ही पद्धत चालू झाली असावी, असे वाटते !  संपादक) दुसर्‍या दिवशी कुत्र्यांंची पूजा होते. कुंकवाचा टिळा लावून झेंडूची माळ घालून गोडधोड दिले जाते.

२. इंडोनेशिया

दिवाळीत रोषणाईद्वारे जल्लोष करणारा इंडोनेशिया

बाली बेटांमध्‍ये देवळांना दिव्‍यांची रोषणाई केली जाते. नृत्‍य आणि वेशभूषा स्‍पर्धा यांचेही समारंभ जागोजागी साजरे होतात.

३. सिंगापूर

दिव्‍यांची आरास करून दिवाळी साजरी करणारे सिंगापूर

दिवाळी भारतासारखीच दणक्‍यात साजरी होते. दिव्‍यांच्‍या आरासमध्‍ये भारताचा राष्‍ट्रीय पक्षी असलेल्‍या मोराचे आकर्षक रूप सगळीकडे विपुल प्रमाणात वापरलेले दिसते.

४. मलेशिया

कलाकृतीपूर्ण खेळातून मलेशियात दिवाळी साजरी !

शॅडो पपेट म्‍हणजेच सावल्‍यांचा खेळ दाखवला जातो. रामायण आणि महाभारत यांतील कथा बाहुल्‍यांच्‍या खेळाद्वारे दाखवण्‍याचे हे कलाकृतीपूर्ण काम असते.

५. थायलंड

थायलंडमधील नयनरम्‍य अन् अवर्णनीय दीपोत्‍सव

केळीच्‍या झाडाच्‍या पानांपासून सिद्ध केलेले सहस्रो दिवे दिवे नदीत सोडलेले असतात. हा दीपोत्‍सव नयनरम्‍य असतो.

६. फिजी

फिजीमधील पुष्‍कळ लोक भारतीय वंशाचे असून पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी होते. नादी शहरात दिव्‍यांच्‍या रोषणाईच्‍या स्‍पर्धा असतात. पंतप्रधानांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून या स्‍पर्धांना प्रारंभ होतो.

७. अमेरिका

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांच्‍यासमोरील फुलांची मांडणी

सहस्रो भारतीय घरी दिवाळी साजरी करतात. भारतीय शहरांच्‍या धर्तीवर दिवाळीनिमित्त विशेष मिठाई बनवून विकल्‍या जातात. अमेरिका, इंग्‍लंड, न्‍यूझीलंड या देशांत स्‍थायिक झालेल्‍या गुजराती स्‍त्रियांनीही हा गृहोद्योग चालू केला आहे.

८. संयुक्‍त राष्‍ट्रे

असंख्‍य दीप प्रज्‍वलित करून सुशोभित अन् प्रकाशमान केलेले स्‍वामीनारायण मंदिर 

संयुक्‍त राष्‍ट्रांत भारतीय घरांमध्‍ये दिवाळी आगळीवेगळी असते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्‍या विद्यापिठांतही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करतात. युनिव्‍हर्सिटी ऑफ ससेक्‍सच्‍या वतीने सांस्‍कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लंडन शहरात मोठी मिरवणूक निघते. त्‍यात भारतीय वाद्ये, नाच आणि कपडे यांचे दर्शन होते. आयुर्वेदिक मसाज (अभ्‍यंगस्नान), मेंदी काढणे, साडी नेसणे आणि नेसवणे या गोष्‍टी हौसेने केल्‍या जातात. विदेशी नागरिकही यात आनंदाने सहभागी होतात.

९. न्‍यूझीलंड

दिवाळीच्‍या दोन आठवडे आधी दिवाली मेला साजरा होतो. त्‍याचे उद़्‍घाटन पंतप्रधानांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून होते.

कल्‍याणी गाडगीळ (दैनिक लोकमत (मंथन), ऑक्‍टोबर २०१६)

देश-विदेशात साजरी होणारी ही आनंदाची दिवाळी म्‍हणजे सर्वांसाठीच धर्माचरणाची सुवर्णसंधी आहे. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्माचरणाची कास धरायला हवी. अशा सण-उत्‍सवांच्‍या माध्‍यमातून हिंदु धर्माची  कीर्ती जगभरात होईल !