Diwali : श्री लक्ष्मीदेवी आणि देश-विदेशातील तिच्‍या पूजनाच्‍या विविध पद्धती !

‘सणासुदीचे रंग आणि उत्‍साह केवळ आपल्‍या भारतातच आहे, असे नव्‍हे, तर ते सर्व विदेशातही आहेत. आपण जशी दिवाळीला श्री लक्ष्मीदेवतेची उपासना करतो, त्‍याचप्रमाणे देशात विविध देवतांचे पूजन केले जाते.

भारतात आपण जिला ‘लक्ष्मी’ म्‍हणतो, त्‍याप्रमाणे रोममध्‍ये ज्‍योतीची देवी ‘वेस्‍ता’ असते. या ज्‍योतीच्‍या देवीची ‘वेस्‍ता’ची पूजा भारतीय परंपरेप्रमाणेच केली जाते. त्‍यामध्‍ये भेद एवढाच की, आपण लक्ष्मीची पूजा दिवाळीत एका रात्री दिवे लावून करतो, तर तेथे ‘वेस्‍ता’ देवीच्‍या मंदिरात अखंड अग्‍नी प्रज्‍वलित ठेवतात. या अग्‍नीचे रक्षण ६ अविवाहित तरुणी करतात. प्राचीन काळी रोमचा सम्राट स्‍वतः मंदिरात जाऊन या ज्‍योतीचे दर्शन घेत असे. रोमप्रमाणेच ग्रीस देशातही लक्ष्मीची पूजा केली जाते. इथे तिला कृषी आणि सामाजिक संपन्‍नतेची देवी ‘री’ म्‍हणून ओळखतात. ‘री’ची तुलना रेवती नक्षत्राशी केली जाते. या देवीची पूजा प्रतीवर्षी २१ नोव्‍हेंबर या दिवशी करतात आणि सर्वत्र दिवे प्रज्‍वलित करून प्रकाशमय केले जाते.

इथेच ‘चेरिस’ नावाची देवी गृहलक्ष्मी मानून तिची घरोघरी पूजा केली जाते. चेरिसचा विवाह विज्ञानदेवता ‘गणपति’सारख्‍याच एका देवासमवेत झाला होता. येथील स्‍त्रिया प्रत्‍येक अमावास्‍येला दिव्‍यांच्‍या झगमगत्‍या थळीने चेरिसची पूजा करतात.

भारतातील लक्ष्मी आणि अ‍ॅथेन्‍सची देवी अ‍ॅथेना यांमध्‍ये तर एवढे साम्‍य आहे की, असे वाटावे की, लक्ष्मीचे व्‍यापक स्‍वरूप म्‍हणजेच अ‍ॅथेना होय. लक्ष्मीप्रमाणेच अ‍ॅथेनाचेही वाहन घुबड आहे. येथील महिला ऐश्‍वर्यवती होण्‍यासाठी या महालक्ष्मी अ‍ॅथेनादेवीची उपासना करतात. त्‍या मंदिरात जाऊन दीप लावतात आणि लिलीची पिवळी फुले वहातात.

अ‍ॅटलसची सातवी मुलगी इलेक्‍ट्रा ‘ज्‍योतीची लक्ष्मी’ म्‍हणून इटलीत पूजली जाते. तेथील लोक समजतात की, पृथ्‍वीपासून आकाशापर्यंत इलेक्‍ट्रा आपला प्रकाश पसरवत असते. तिची मोठी बहीण बुडिश हिला आकाशाची देवी मानले जाते.

कंबोडियामध्‍ये अंकोरवाट नावाचे एक भव्‍य विष्‍णुमंदिर आहे. तेथील लोक जीवन ज्‍योती देवीची पूजा दीप प्रज्‍वलित करून करतात.

सुदानमध्‍ये देेवी मूर्तीजाची पूजा केली जाते. त्‍यामुळे ‘धन-धान्‍यात वृद्धी होते’, असे मानले जाते.

इंडोनेशियात लक्ष्मीची पूजा धान्‍य निर्माण करणार्‍या देवीच्‍या रूपात केली जाते.

श्रीलंकेतील जनतादेवी लंकिनीची पूजा करतात. देवी लंकिनी ही वैभव आणि ऐश्‍वर्य यांची देवी मानली जाते. नेपाळ, थायलंड, जावा, सुमात्रा, मॉरिशस गुयाना, दक्षिण आफ्रिका, जपान इत्‍यादी ठिकाणीही विविध रूपांत महालक्ष्मीची पूजा केली जाते.’

(साभार : अक्‍कलकोट ‘स्‍वामीदर्शन’, दिवाळी २००७)