भूमी बळकावण्याशी संबंधित ‘मनी लाँडरिंग’ प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची मोठी कारवाई !
(‘मनी लाँडरिंग’ म्हणजे आर्थिक गैरव्यवहार)
पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) : अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) गोव्यातील भूमी बळकावण्याशी संबंधित ‘मनी लाँडरिंग’ प्रकरणी तिघांच्या विरोधात कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या ८ ठिकाणच्या एकूण ११ कोटी ८२ लाख रुपये किमतीच्या स्थावर मालमत्ता कह्यात घेतल्या आहेत. ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग’ कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
मूळ मालकाची फसवणूक करून भूमी किंवा मालमत्ता बळकावून खरेदीदाराची फसवणूक केल्याविषयी पर्वरी पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे विभाग यांनी नोंदवलेल्या प्रथमदर्शनी अहवालाच्या (‘एफ्.आय.आर्.’च्या) आधारावर अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अन्वेषणातून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित संशयित आरोपी भूमी बळकावण्याच्या उद्देशाने प्रथम ‘एखाद्या मालमत्तेचा मालक कायदेशीर वारसाविना मृत पावला असेल’, अशी मालमत्ता शोधत होते. अशी भूमी सापडल्यानंतर मूळ मालकाची फसवणूक करून त्याच्या नावे विक्री करार किंवा ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ करून ती मालमत्ता कह्यात घेत होते आणि त्याची पुढे विक्री करत होते.