Narakchaturdashi : स्‍वभावदोष, अहंकार आणि विकार रूपी नरकासुराच्‍या तावडीतून सोडवण्‍यासाठी श्रीकृष्‍णाला आळवून देहासह मनानेही परिशुद्ध होऊया !

उद्या १२ नोव्‍हेंबरला असलेल्‍या नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्‍या निमित्ताने…

‘आश्विन कृष्‍ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’, असे म्‍हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने क्रूरकर्मा नरकासुराचा वध करून त्‍याच्‍या बंदीवासातील १६ सहस्र स्‍त्रियांना मुक्‍त केले. या आनंदाप्रीत्‍यर्थ लोकांनी घरोघरी दीपोत्‍सव साजरा केला.

नरकासुराच्‍या वधाप्रीत्‍यर्थ आनंदोत्‍सव साजरा करण्‍यासाठी आपण ‘नरकचतुर्दशी’ साजरी करतो खरी; परंतु आपल्‍यातील स्‍वभावदोष आणि अहं रूपी नरकासुरामुळे आपल्‍याला नरकयातनाच भोगाव्‍या लागतात. हा स्‍वभावदोष आणि अहंकार रूपी नरकासुर आपल्‍या जीवनातील आनंदच हिरावून घेतो. देह निरोगी असला, तरी मन विकारांनी ग्रस्‍त असल्‍यास ईश्‍वरप्राप्‍तीचे ध्‍येय कसे प्राप्‍त होईल ? म्‍हणून आपले मन शुद्ध आणि निरोगी करण्‍यासाठी साक्षात् श्रीकृष्‍ण परमात्‍मा अवतरणार आहे. या नरकचतुर्दशीला आपण सर्वांनी आपल्‍या मनाला स्‍वभावदोष, अहंकार आणि विकार रूपी नरकासुराच्‍या तावडीतून सोडवण्‍यासाठी श्रीकृष्‍ण परमात्‍म्‍याला आळवूया. देहासह मनानेही परिशुद्ध होऊन आपण याच जन्‍मात भगवंताची प्राप्‍ती करूया !’

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘लक्ष्मी’ या शब्‍दाचा अर्थ 

‘लक्ष्मी’ या शब्‍दाचा अर्थ पुष्‍कळ सुंदर आहे. लक्ष्य + मी = लक्ष्मी ! जी लक्ष्यापर्यंत, म्‍हणजे ध्‍येयापर्यंत घेऊन जाते, ती लक्ष्मी ! आपल्‍याला आपल्‍या ‘ईश्‍वरप्राप्‍ती’च्‍या ध्‍येयापर्यंत पोचवण्‍यासाठी देवी महालक्ष्मी आता अवतरणार आहे. आपण सर्वांनी ध्‍येयप्राप्‍तीसाठी तिची पुष्‍कळ आळवणी करूया. आपल्‍या अंतरात तिचे भक्‍तीपूर्ण पूजन करून तिच्‍या कृपाशीर्वादाची याचना करूया !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१०.११.२०२३)

लक्ष्मीपूजनाला भक्‍तीरूपी दिव्‍यांची आरास करून अंतरातील सद़्‍गुणरूपी श्री महालक्ष्मीला प्रसन्‍न करून घेऊया !

‘दीपावलीला अमावास्‍येच्‍या तिन्‍हीसांजेला सद़्‍गृहस्‍थांच्‍या घरी श्री लक्ष्मीदेवीचे आगमन होते. घराला पूर्णतः स्‍वच्‍छ, शुद्ध आणि सुशोभित करून दीपावली साजरी केल्‍यामुळे श्री लक्ष्मीदेवी प्रसन्‍न होते अन् तिथे कायमस्‍वरूपी निवास करते.

आपल्‍याकडे लक्ष्मी नसेल, तर बल, सत्त्व, धैर्य, शक्‍ती आणि बुद्धी इत्‍यादीही लाभणार नाही. जिथे लक्ष्मी आहे, तिथे सर्वकाही आहे. जिथे लक्ष्मी नाही, तिथे काहीच नाही; कारण श्री लक्ष्मी म्‍हणजेच धनसंपदा, धान्‍यसंपदा, सुखसंपदा, गुणसंपदा आणि ईशसंपदा, म्‍हणजेच ईश्‍वराची कृपा आहे ! लक्ष्मी आपल्‍यामध्‍ये बल, मनोबल, ऊर्जा आणि बुद्धी या रूपांतही वास करते. तिचे मोल जाणून आपण तिच्‍याप्रती सदैव कृतज्ञ राहूया ! आपला देह आणि मन परिशुद्ध करून त्‍यांमध्‍ये ईश्‍वरी गुणांची निर्मिती करण्‍यासाठी आपण देवी महालक्ष्मीला याचना करूया. आपण आपल्‍यातील सद़्‍गुण वाढवून त्‍या सद़्‍गुणांच्‍या रूपात अंतरी वास करणार्‍या महालक्ष्मीदेवीचे पूजन करूया. समस्‍त आध्‍यात्मिक गुणसंपदेने युक्‍त महालक्ष्मीचे स्‍वागत करण्‍यासाठी आपल्‍या भक्‍तीरूपी दिव्‍यांची आरास करून तिला प्रसन्‍न करून घेऊया !’

आपल्‍या अंतरातून स्‍वभावदोष आणि अहं रूपी अलक्ष्मीचे निःसारण करण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करून हृदयमंदिरात सद़्‍गुणरूपी श्री महालक्ष्मीला स्‍थानापन्‍न करूया !

‘आश्विन अमावास्‍येला अलक्ष्मीचे निःसारण केले जाते. आपल्‍यात गुण निर्माण झाले, तरी दोष नष्‍ट झाल्‍यावरच गुणांना महत्त्व प्राप्‍त होते. आपल्‍यातील विकार, स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे आपल्‍या मनात येणारा प्रत्‍येक विचार आपल्‍याला भगवंतापासून दूर नेतो. आपल्‍या अंतरातून या विकाररूपी अलक्ष्मीचे निःसारण करण्‍यासाठी आपण सर्वांनी अत्‍यंत तळमळीने प्रयत्न करूया. त्‍यानंतरच श्री महालक्ष्मीदेवी आपल्‍या हृदयमंदिरात येणार आहे. आपल्‍या हृदयमंदिरात साक्षात् महालक्ष्मीदेवीचा प्रवेश होण्‍यासाठी आपण सर्वांनी आपली भक्‍ती वाढवूया आणि तिच्‍या बळावर स्‍वभावदोष अन् अहं यांवर विजय मिळवून तिची कृपा संपादन करूया.

आपल्‍याला दिवाळीचा आंतरिक आनंद प्राप्‍त करायचा असेल, तर स्‍वतःमधील अवगुणरूपी अलक्ष्मी दूर करण्‍याचा निश्‍चय करून ‘सद़्‍गुणरूपी लक्ष्मी प्राप्‍त व्‍हावी’, अशी आपण देवीला प्रार्थना करूया !’

कुबेरपूजन

साधकांनो, ‘श्री गुरूंनी दिलेले ‘गुरुकृपारूपी धन’ हृदयात अत्‍यंत भावपूर्ण सांभाळता यावे’, यासाठी कुबेरदेवतेला आर्त याचना करूया !

‘या दिवशी लक्ष्मीसह कुबेराचेही पूजन केले जाते. लक्ष्मी ही धनाची देवता आहे, तर कुबेर संपत्तीचा सांभाळ करणारा आहे. ‘प्राप्‍त झालेले धन कसे सांभाळले पाहिजे ?’, हे कुबेरदेवता शिकवते.

साक्षात् अवतारी नारायणस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेने आपल्‍याला जीवनातील उत्तमोत्तम असे सर्वकाही प्राप्‍त होऊन आपल्‍या जीवनात आध्‍यात्मिक भरभराट झाली आहे. आपल्‍या जीवनातील प्रत्‍येक क्षण आनंदी करण्‍यासाठी श्री गुरूंनी आपल्‍याला अनेक गोष्‍टी प्रदान केल्‍या आहेत; मात्र ‘या सार्‍यांचा सांभाळ करणे, ते सर्व कृतज्ञताभावाने टिकवणे’, हेही अत्‍यंत आवश्‍यक आहे. या सर्वांचे मोल जाणून आपण गुरूंप्रती सदैव कृतज्ञ रहायला हवे. अल्‍पशा प्रयत्नांनी प्रसन्‍न होऊन; किंबहुना स्‍वबळाने काही प्रयत्न केलेले नसतांनाही श्री गुरूंनी अनेकांना आध्‍यात्मिक प्रगतीरूपी अनमोल भेट दिली आहे. श्री गुरूंनी आपल्‍या जीवनात दिलेले विविध अनमोल अन् दैवी क्षणमोती आपण आपल्‍या हृदयात अत्‍यंत भावपूर्ण सांभाळून ठेवूया. ‘गुरुदेवांनी दिलेले हे ‘गुरुकृपारूपी धन’ सांभाळून कसे ठेवायचे ?’, हे शिकवण्‍यासाठी साक्षात् कुबेरदेवता अवतरणार आहे. त्‍यासाठी आपण सर्वांनी कुबेरदेवतेला शरण जाऊन तिच्‍याकडे आर्त याचना करूया !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (१०.११.२०२३)