१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’मधून दर्शन घेणे
‘कपिलेेश्वरीला (गोवा, फोंडा येथील एक ठिकाण) श्री. मदनप्रसाद जैसवाल या नावाचे भाजीविक्रेते आहेत. ६.५.२०२३ या दिवशी आम्ही त्यांच्या दुकानात संतांसाठी फळे आणायला गेलो होतो. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला कधी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले आहे का ?’’ ते मला म्हणाले, ‘‘हो. ते मला प्रतिदिन दर्शन देतात. मी त्यांना २० वर्षांपूर्वी लांबून पाहिले होते; पण आता ते मला प्रतिदिन दिसतात.’’ (ते प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात. त्यातून दर्शन होते, असे त्यांना म्हणायचे आहे.)
२. कर्तेपणा नसणे
त्या भाजीविक्रेत्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही त्यांनी गुरुदेवांसाठी २ आंबे मूल्य न घेता मला दिले. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही आंबे दिले आहेत, असे सांगते.’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘काही सांगायची आवश्यकता नाही.’’ यावरून ‘त्यांच्यात कर्तेपणा नाही’, हे माझ्या लक्षात आले. सर्वसाधारण माणसाला छोट्या छोट्या गोष्टींचा कर्तेपणा असतो आणि महत्त्व मिळायला हवे असते.
३. ब्रह्मोत्सवाला जाण्याची संधी मिळणे आणि गुरुदेवांचे जवळून दर्शन झाल्यामुळे भावजागृती होणे
११.५.२०२३ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा झाला. १३.५.२०२३ या दिवशी आम्हीश्री. जैसवाल यांना विचारले, ‘‘तुम्ही ब्रह्मोत्सवाला आला होतात का ?’’ तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘उत्सवाच्या ५ – ६ दिवस आधी मी एका साधकाला विचारले होते की, ‘‘मला यायला मिळेल का ?’’ त्यांनी ‘‘मी विचारून सांगतो’’, असे सांगितले होते. १०.५.२०२३ पर्यंत त्या साधकांकडून मला काहीच कळले नाही. मी कार्यक्रमस्थळी चालत जाण्यासही सिद्ध होतो.
अकस्मात् चमत्कार झाल्याप्रमाणे मला साधकाचा निरोप आला की, मला कार्यक्रमाला जाण्यास अनुमती मिळाली आहे. त्यानंतर साधक मला त्यांच्याकडील चारचाकी गाडीने कार्यक्रम स्थळी घेऊन गेले. मला दूरचे स्पष्ट दिसत नाही. गुरुदेवांच्या कृपेने मला व्यासपिठाजवळ बसायला मिळाले आणि गुरुदेवांचे व्यवस्थित दर्शन झाले. तसेच गुरुदेवांची गाडी बाहेर जात असतांना मी त्यांना ‘राम, राम’ केला. तेव्हा त्यांनीही मला ‘राम, राम’ केला. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.’’ हे सगळे त्यांनी भावविभोर होऊन सांगितले.
४. आध्यात्मिक उपाय केल्यावर अडचणी सुटणे
कोरोना महामारीच्या काळात त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय बंद पडल्याने ते मोठ्या संकटात होते. ते गावी गेले आणि परत आल्यावर भाजीचे दुकान परत चालू केले. तेव्हा सरकारी यंत्रणांकडून त्यांना पुष्कळ अडचणी आल्या. नंतर एका साधकाने त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला येणार्या अडचणी कागदावर लिहून त्याच्याभोवती नामजपाचे मंडल काढून ठेवा.’’ त्यानुसार त्यांनी केले आणि त्यांच्या सर्व अडचणी सुटल्या.
त्यांच्यात पुष्कळ भाव असून ते सतत आनंदात असतात. ‘अडचणीत असतांना जे भावावस्थेत राहू शकतात, तेच गुरुदेवांना अधिक प्रिय आहेत; म्हणूनच गुरुदेवांनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना ब्रह्मोत्सवाची अनुभूती दिली असावी’, असे मला वाटते.’
– डॉ. रूपाली भाटकार, गोवा. (१४.५.२०२३)