छत्रपती संभाजीनगर येथे भेसळयुक्‍त सुट्या खाद्यतेलाची सर्रास विक्री !

अन्‍न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – करडई आणि शेंगदाणा तेल आरोग्‍यास हितकारक असल्‍याने ग्राहकांची त्‍याला मोठी मागणी असते; मात्र याच करडई आणि शेंगदाणा तेलात अन्‍य तेलांची भेसळ करून उघडपणे विक्री होत असल्‍याचे एका वृत्तपत्राने केलेल्‍या पडताळणीत उघडकीस आले आहे. अन्‍न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन करून ही भेसळ केली जात आहे.

अन्‍न सुरक्षा मानके कायद्यातील नियम २०११ नुसार सुट्या खाद्यतेलाच्‍या विक्रीवर बंदी असतांना शहरातील जुना मोंढा, चेलीपुरा, टीव्‍ही सेंटर, जाधववाडी, कांचनवाडी, पुंडलिकनगर आणि चिकलठाणा या ठिकाणी दिवाळी सणासाठी ग्राहकांची मागणी वाढल्‍याने सुट्या तेलाची सर्रास विक्री होत आहे. या सुट्या खाद्यतेलांची गुणवत्ता आणि दर्जा पडताळण्‍यासाठी काही नमुने संकलित करून छावणी प्रयोगशाळेत पडताळले, तेव्‍हा करडई आणि शेंगदाणा तेल यांमध्‍ये भेसळ आढळली.

केंद्र सरकारने सुट्या तेल विक्रीवर बंदी घातली असतांनाही लाखो लिटर सुट्या तेलाची सर्रास विक्री होत आहे. तीळ, जवस, करडाई, शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन असे सर्वच प्रकारचे तेल उघडपणे विकले जात आहे. यात करडई आणि शेंगदाणा तेलाचे भाव अधिक असल्‍याने त्‍यातील भेसळीचे प्रमाणही मोठे आहे. बाजारात विकल्‍या जाणार्‍या ६ तेलांचे नमुने पडताळले असता त्‍यात भेसळ होती.

‘‘नेहमी हे भेसळयुक्‍त तेल खाण्‍यात आले, तर ते आरोग्‍यासाठी हानीकारक ठरते. हे तेल एकप्रकारे विषच (स्‍लो पॉयझन) आहे. भेसळयुक्‍त तेल खाल्‍ल्‍याने हृदयविकाराचा धोका वाढतो. खराब कोलेस्‍टेरॉलची पातळी वाढते. पोटाचे विकार वाढतात. जुलाब होण्‍याचीही शक्‍यता असते.  – आधुनिक वैद्य आनंद निकाळजे, हृदयरोगतज्ञ

संपादकीय भूमिका : 

भेसळयुक्‍त पदार्थांची पडताळणी करून भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याविषयी कायद्यात प्रावधान आहे. तरीही अन्‍न आणि औषध प्रशासन नियमितपणे भेसळयुक्‍त पदार्थांची पडताळणी करत नाही. त्‍यामुळेच सर्व पदार्थांत भेसळीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी प्रशासनाने याची गंभीर नोंद घेऊन भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !