‘एन्.आय.ए.’कडून ७ आतंकवाद्यांविरुद्ध मुंबईतील विशेष न्‍यायालयात आरोपपत्र प्रविष्‍ट !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – आतंकवादी संघटना ‘इसिस’च्‍या महाराष्‍ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात आतंकवादी कारवाया करण्‍याचा कट उधळला आहे. या प्रकरणी अटक केलेल्‍या ७ आतंकवाद्यांविरुद्ध राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) मुंबईतील विशेष न्‍यायालयात आरोपपत्र प्रविष्‍ट केले आहे. महंमद इम्रान महंमद युसुफ खान, महंमद युनुस महंमद याकूब, कादीर दस्‍तगीर पठाण, समीब काझी, जुल्‍फीकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत. (‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्‍हणणारे निधर्मी, साम्‍यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्‍हणायचे आहे ? – संपादक) त्‍यांच्‍याविरुद्ध स्‍फोटके सिद्ध करणे, स्‍फोटके बाळगणे, तसेच विविध कायद्यांन्‍वये गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. ‘एन्.आय.ए.’ने ३ दिवसांपूर्वी कोंढव्‍यातून पसार झालेला आतंकवादी महंमद आलम याला अटक केली होती. आलमला ‘एन्.आय.ए.’च्‍या कोठडीत ठेवण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.

१. पुणे येथील कोथरूड भागात दुचाकी चोरतांना इम्रान खान, महंमद साकी, महंमद आमल यांना जुलैमध्‍ये अटक करण्‍यात आली होती. कोंढव्‍यात आरोपी साकी, खान, आमल वास्‍तव्‍यास होते. त्‍यांच्‍या घराची झडती घेतल्‍यावर त्‍यांचे बंदी घातलेल्‍या अल सुफा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्‍याचे अन्‍वेषणात उघड झाले होते. राजस्‍थानात चितोड परिसरात त्‍यांच्‍याविरुद्ध स्‍फोटके बाळगल्‍याचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. तेव्‍हापासून ते पसार झाले होते, तसेच ते आतंकवादी संघटना ‘इसिस’च्‍या संपर्कात असल्‍याचे अन्‍वेषणातून उघडकीस झाले होते. महाराष्‍ट्र, गोवा, तेलंगाणा येथे ‘इसिस’च्‍या विचारधारेचा प्रसार करण्‍याचे काम त्‍यांच्‍याकडे सोपवण्‍यात आले होते.

२. आतंकवाद्यांकडून पिस्‍तूल, स्‍फोटके सापडली होती. कारवायांचे प्रशिक्षण देण्‍यासाठी कोंढव्‍यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. बाँबस्‍फोट घडवल्‍यानंतर अटक टाळण्‍यासाठी त्‍यांनी दुर्गम भागात लपण्‍याची जागा शोधली होती. पुण्‍यातील महत्त्वाच्‍या लष्‍करी संस्‍थांच्‍या परिसराचे त्‍यांनी ‘ड्रोन कॅमेर्‍या’द्वारे चित्रीकरण केले होते, असे ‘एन्.आय.ए.’ने दाखल केलेल्‍या आरोपपत्रात म्‍हटले होते. (भगव्‍या झेंड्याच्‍या सामर्थ्‍यावर सर्व इस्‍लामी आक्रमकांच्‍या छातीत धडकी भरवणारे पुणे शहर आज इस्‍लामी आतंकवाद्यांचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्‍यामुळे इस्‍लामी आतंकवादाची पाळेमुळे खणून काढण्‍यासाठी पोलीस आणि गुप्‍तचर यंत्रणांना अधिक सतर्कता बाळगणे आवश्‍यक आहे ! – संपादक)