आतापर्यंत १६८ जणांना अटक, १२ कोटी रुपयांची हानी !
मुंबई – सार्वजनिक मालमत्तांची हानी करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल. आतापर्यंत १६८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर संभाजीनगर जिल्ह्यात ५४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कायदा हातात घेतला जाईल, त्या ठिकाणी सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तांची अंदाजे १२ कोटी रुपयांची हानी झाली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी १ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
रजनीश शेठ पुढे म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अशा ठिकाणची परिस्थिती निवळली आहे. ज्या ठिकाणी मराठा आंदोलन शांततेत चालू आहे, त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळेल. हानीच्या संदर्भातील संपूर्ण माहितीही गोळा केली जात आहे. कुणीही हिंसक वळण देऊ नये. ज्या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या, तेथे संचारबंदी लागू केलेली आहे. अशा जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस फौजही तैनात करण्यात आलेली आहे.
बीड येथे ३०७ अंतर्गत ७ जणांवर गुन्हा नोंद !
रजनीश शेठ पुढे म्हणाले की, बीड येथे २० गुन्हे नोंद झाले आहेत, तसेच तेथे ३०७ कलमाअंतर्गत ७ गुन्हे नोंद झाले आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि बीड येथे संगणकीय जालाची (इंटरनेटची) सेवा काही काळापुरती बंद केलेली आहे.