श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार !
(‘दक्षिण दिक्पाल’ म्हणजे दक्षिण दिशेहून येणार्या आक्रमणाच्या संरक्षणासाठी उभे असलेले द्वारपाल)
सांगली, १ नोव्हेंबर (वार्ता.) – तत्कालीन सांगली संस्थानचे राजे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन घराण्याचा पराक्रमी आणि विजयी इतिहास ही हिंदवी स्वराज्याचे ‘दक्षिण दिक्पाल’ ही उपाधी सार्थच ठरवतो, असे प्रतिपादन उद्योजक श्री. किशोर पटवर्धन यांनी येथे केले. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने येथील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांचा आणि त्यांच्या पत्नी राणीसाहेब श्रीमंत सौ. राजलक्ष्मीराजे यांचा सत्कार नुकताच ‘खरे क्लब’ येथे पार पडला. ब्राह्मण समाजाने आयोजित केलेल्या या सोहळ्याला श्रीमंत उदयसिंह पेशवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तत्कालीन सांगली संस्थान, सांगली येथील गणपति मंदिर आणि पटवर्धन राजघराणे यांचे अन् सांगलीसह परिसराचे अतूट, तसेच जिव्हाळ्याचे नाते आहे. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी सांगलीची समृद्धी आणि विकास यांसाठी मोठे योगदान दिले आहे.
निरांजनाने दीपप्रज्वलन करून सोहळ्याचा प्रारंभ झाला. वेदमंत्र पठण, सुवासिनींकडून औक्षण, पेशवे यांच्या मातोश्री सौ. जयमंगला राजे यांच्या हस्ते सत्कार आणि मनोगत व्यक्त करून, तसेच सौ. चंदनाताई देशपांडे यांनी गायलेल्या सांगली संस्थान गीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमात श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या जीवनपटावर आधारित व्हिडिओ (ध्वनीचित्रचकती) दाखवण्यात आला. उद्योजक, अभियंता, संगीत दिग्दर्शक, तसेच गणपति पंचायतन मंदिराचे सुशोभिकरण आणि विस्तार अशा विविध माध्यमांतून राजे सरकार यांनी अखंड जनसेवा केली. मॉरिशस या देशात, तसेच मध्य पूर्व आशियातील देशांमध्ये कारखाने चालू करून उद्योग विश्वात, तसेच अनेक हिंदी चित्रपटात संगीत दिग्दर्शक असा नावलौकिक राजेसाहेबांनी मिळवला आहे.
पटवर्धन घराण्याचा इतिहास सांगतांना श्री. किशोर पटवर्धन म्हणाले की, श्रीमंत पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभट बाबा पटवर्धन, तसेच त्यांचे ७ सुपुत्र आणि त्यांच्या पुढील अनेक पिढ्या पुणे येथील श्रीमंत पेशवे यांच्या आदेशाने हिंदवी स्वराज्यात अनेक लढाया लढल्या. म्हैसूर येथील राजे वडियार यांना दगाफटका करून राज्य मिळवलेला त्यांचा गद्दार सेनापती टिपू सुलतान याच्याशी झालेल्या युद्धात त्याचा पाडाव पटवर्धन सरदारांनीच केला. या लढाईत ८ सहस्र घोडेस्वार, पायदळ यांसह परशुराम भाऊ पटवर्धन सरदारांनी नेतृत्व केले होते. छत्रपतींच्या २ गाद्यांमधील बेदिली दूर करून हिंदवी स्वराज्य एकसंघ ठेवण्याची महत्त्वाची भूमिका पटवर्धन यांनी केली.
उपस्थित मान्यवर
पुणे येथील युवराज पुष्करसिंह पेशवे सरकार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, उद्योजक गिरीश चितळे, रामभाऊ वेलणकर, अरुण दांडेकर, बापूसाहेब पुजारी, मिरजेचे श्रीमंत गंगाधर बाळासाहेब पटवर्धन, गोपाळराजे पटवर्धन, भाजपच्या नीताताई केळकर, अधिवक्ता समीर पटवर्धन, जगदीश पटवर्धन, काँग्रेसचे नेते अजितराव घोरपडे, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांना मानपत्र आणि चांदीची स्मरणमुद्रा देऊन गौरवण्यात आले.
२. या कार्यक्रमास उपस्थित रहाण्यासाठी पुणे येथून जेव्हा पेशवे सरकारांनी येथील मंदिरात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या स्वागतास उपस्थित रहाता आले नाही, असे सांगून श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी जाहीर क्षमायाचना केली.