हुपरी (जिल्हा-कोल्हापूर) – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य उभारणीमध्ये मावळे आणि गडकोट यांची साथ मिळाली. छत्रपती शिवरायांनी पहिला दुर्ग हा दिवाळीमध्ये जिंकला आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून मातीचे छोटे छोटे दुर्ग बांधण्याची परंपरा महाराष्ट्रात चालू झाली. त्यातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘दुर्गवेध प्रतिष्ठान’च्या वतीने हुपरी पंचक्रोशीसाठी दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात प्रथम क्रमांक – १५ सहस्र १ रुपया, द्वितीय क्रमांक – १२ सहस्र १ रुपया, तृतीय क्रमांकास ९ सहस्र १ रुपया, चतुर्थ क्रमांकास ७ सहस्र १ रुपया, पाचव्या क्रमांकास ५ सहस्र १ रुपया देण्यात येणार आहे. याचसमवेत उत्कृष्ट बांधणी आणि उत्कृष्ट निवेदक यांना चषक देण्यात येणार असून सर्व विजेत्या स्पर्धकांना मानाचा फेटाही देणार आहोत. दुर्गपरीक्षण १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होईल, तर बक्षीस वितरण २६ नोव्हेंबरला होईल. सर्व सहभागी स्पर्धकांना दुर्ग माहितीचे पुस्तक देण्यात येईल.
दुर्ग परीक्षणाच्या वेळी दुर्ग मशालीच्या उजेडात आणि विद्युत् प्रकाशात पाहिला जाईल, परीक्षणाच्या वेळी दुर्गाच्या संदर्भात ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती विचारली जाईल, तसेच शिवचरित्राविषयी प्रश्न विचारले जातील. परीक्षणाच्या वेळी दुर्गाभोवतीचे वातावरण शिवमय आणि ऐतिहासिक असावे. नाव नोंदणीप्रसंगी ३०१ रुपये प्रवेश शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी श्री. प्रवीण पाटील – ७६२०४०८३२२, श्री. नितीन खेमलापुरे – ९५०३४०८२९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.