मराठा आरक्षण प्रकरणी गावबंदीचा सर्वपक्षीय नेत्यांना फटका !
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेते आणि मंत्री यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका सर्वपक्षीय नेत्यांना बसला आहे. अहिल्यानगरमध्ये २९ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघा’च्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते; मात्र सध्या मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढल्याने या ३ मंत्र्यांचा दौरा रहित झाला आहे.
अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या कार्यक्रमाच्या फलकावर मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांचे छायाचित्र लावण्यात आले होते; मात्र आरक्षणाविषयी कोणताही निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या येथील सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने हे फलक काढून टाकण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सर्व शिक्षकांनीही आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला असून त्यांनी त्वरित मंत्र्यांचे छायाचित्रे असलेला फलक काढला.
बार्शी – तहसील कार्यालयासमोर आरोग्य खात्याच्या वतीने लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फलकाला मराठा आंदोलकांनी काळे फासले. ‘राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू असतांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेलिकॉप्टरमधून दौरे काढत आहेत. यापुढे त्यांना बार्शी येथे पाय ठेवू देणार नाही’, अशी चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.