पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणार्‍या हिंदुस्तान पेट्रोलियम अणि टाटा पॉवरसह अन्य उद्योगांना नोटीस !

  • मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय !

  • प्रदूषण न्यून करण्यासाठी नियमावली घोषित !

मुंबई – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहुल येथील इंधन निर्मिती करणार्‍या उद्योगांना पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७ ऑक्टोबर या दिवशी नोटीस बजावली आहे. त्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स आणि सिलॉर्ड कंटेनर्स या आस्थापनांचा समावेश आहे. एजिस लॉजिस्टिक्स आणि सिलॉर्ड कंटेनर्स या उद्योगांची अनुक्रमे १० अन् ५ लाख रुपयांची बँक हमी जप्त करून त्यांना ५० टक्क्यांपर्यंतच उत्पादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रदूषण न्यून करण्यासाठी नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील इतर शहरे, ग्रामीण विभाग यामध्ये हवा प्रदूषण नियंत्रणासाठी मंडळाने नियमावली घोषित केली आहे. या नियमावलीत ‘शहरातील बांधकामविषयीची नियमावली मुंबईप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेकरी उद्योग, स्मशानभूमी येथे लाकूड जाळण्याऐवजी विद्युत् वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरांनी त्यांच्या स्वत:कडील सामग्रीचा वापर करून हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे वाढवावीत. जनजागृती करावी’, असेही या नियमावलीत म्हटले आहे.